रत्नागिरी : महिलांनी मोबाईलद्वारे समाजमाध्यमांवर पुरेशी काळजी घेऊन योग्य पासवर्डचा वापर करून, सांभाळूनच वावर करावा, असे प्रतिपादन पोलिस निरीक्षक सायबर पोलिस ठाण्याच्या पोलिस निरीक्षक स्मिता सुतार यांनी केले. सीए इन्स्टिट्यूटच्या रत्नागिरी शाखेतर्फे मथुरा एक्झिक्युटिव्ह येथे महिला दिन कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
या प्रसंगी त्यांनी सांगितले की, ई-मेल आयडी व त्याचा पासवर्ड, ओटीपी कोणालाही सांगू नये. कारण, तुमची डिजिटल ओळख त्यावरच अवलंबून असते. त्याला आर्थिक अॅप्स्, बँकखाते, आधारकार्ड व अन्य अनेक गोष्टी जोडलेल्या असतात. आता विविध प्रकारचे फसवणुकीचे प्रकार उघडकीस येत आहेत. काहीतरी फुकट मिळत आहे म्हणून खरेदी करायला जाऊ नये. जास्त पैशांचे खाते स्वतंत्र व विविध पेमेंट अॅप्ससाठी वेगळे खाते ठेवा व त्यात शिल्लक रक्कम कमी ठेवा म्हणजे मोठी फसवणूक टाळता येऊ शकते.
महिला सुरक्षा विशेष कक्षाच्या पोलिस उपनिरीक्षक गायत्री पाटील यांनी सांगितले की, महिलांच्या सुरक्षेसाठी अनेक कायदे लागू आहेत. शासन व पोलिस प्रशासन त्याची अंमलबजावणी करत आहे. महिला सुरक्षा समितीद्वारे कौटुंबिक वाद मिटवण्यासाठी प्रयत्न केले जातात. यामध्ये समुपदेशक, समाजसेवक, डॉक्टर, वकील, मानसोपचार तज्ज्ञ असतात. महिलांना विश्वास वाटावा यासाठी भरोसा कक्ष स्थापना केला आहे. शालेय विद्यार्थ्यांसाठी पोलिस काका व पोलिसदीदी योजना आहे. सीए इन्स्टिट्यूटचे शाखाध्यक्ष सीए मंदार जोशी व करसल्लागार असोसिएशन रत्नागिरी जिल्हाध्यक्ष सीए वरदराज पंडित यांनी मान्यवरांचा सत्कार केला. सूत्रसंचालन सीए नयन सुर्वे यांनी केले. यावेळी ७०हून अधिक सीए व सीए फर्ममधील कर्मचारी उपस्थित होत्या.
आपण इंटरनेटवर किती अवलंबून आहोत. कारण, प्रत्येक घरात सर्व सुविधा इंटरनेट आणि एआय उपलब्ध आहेत; पण हे सर्व करत असताना अतिशय सावधपणे इंटरनेटचा वापर करावा. सध्या युद्ध, हिंसाचार, लव जिहाद, आर्थिक फसवणूक यासाठी सुद्धा इंटरनेटचा वापर होताना दिसत आहे. तरीही या सर्वासाठी अत्यंत सजग राहून काम करणे गरजेचे झाले आहे. – सीए मंदार जोशी
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:44 PM 12/Mar/2025














