रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाच्या मागणीला यश; रत्नागिरीत २९ हजार ५५० कोटींची गुंतवणूक

◼️उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या प्रयत्नाने साडेपाच हजार प्रत्यक्ष तर ३३ हजार अप्रत्यक्ष रोजगार उपलब्ध होणार

रत्नागिरी : रत्नागिरी तालुक्यातील बाजारपेठांमध्ये आर्थिक उलाढाल वाढवण्यासाठी तालुक्यात मोठे उद्योगधंदे येणे आवश्यक आहे. ज्यामुळे येथील बेरोजगार तरुणांना काम मिळून तालुक्यातील अर्थव्यवस्थेला चालना मिळेल. अशी मागणी रत्नागिरी शहर व्यापारी महासंघाच्या वतीने उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडे सातत्याने करण्यात येत होती. याबाबतचे निवेदन देखील उद्योगमंत्री उदय सामंत यांना देण्यात आले होते. आज अखेर या मागणीला यश आल्याचे दिसत आहे. रत्नागिरी तालुक्यातील एमआयडीसी क्षेत्रांमध्ये दोन प्रमुख प्रकल्पांसाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीने काल मंजुरी दिली आहे. या प्रकल्पांमुळे कोकणात २९ हजार ५५० कोटींची गुंतवणूक होणार आहे. यातून सुमारे ३८ हजार रोजगारनिर्मिती होणार आहे. वेल्लोर इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी पार्क प्रायव्हेट लिमिटेड (VITPARK) वेल्लोर इन्फॉरमेशन टेक्नॉलॉजी पार्क (VITPARK) हा उच्च तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्प असून, Silicon wafers आणि चिप्सचे उत्पादन जागतिक स्तरावर करणार आहे. बंद पडलेल्या स्टरलाइट कंपनीच्या ५५० एकर जागेचा वापर करून हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे.

त्याचसोबत मंत्रिमंडळाच्या उपसमितीने आज रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड च्या संरक्षण क्षेत्राशी निगडीत प्रकल्पालाही मान्यता दिली आहे. भारताच्या संरक्षणसिद्धतेच्या दृष्टीकोनातून महत्वाचा असलेला हा प्रकल्प रत्नागिरीत होत असल्याने कोकणाच्या अर्थव्यवस्थेलाही गती मिळणार आहे. संरक्षण क्षेत्राला लागणाऱ्या शस्त्र-शस्त्रास्त्रांची निर्मिती करणाऱ्या या प्रकल्पासाठी दहा हजार कोटींची गुंतवणूक होणार आहे, तर ४५०० प्रत्यक्ष रोजगारनिर्मिती होणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 05-10-2024