भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या नऊ महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत. दरम्यान, आता त्यांचा पृथ्वीवर परतण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. नॅशनल एरोनॉटिक्स अँड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन आणि स्पेसएक्सने आता याबाबत घोषणा केली आहे.
‘क्रू-10 मिशन शुक्रवारी संध्याकाळी ७:०३ वाजता म्हणजेच शनिवारी पहाटे ४:३० वाजता प्रक्षेपित केले जाईल. या मोहिमेचे उद्दिष्ट अमेरिकन अंतराळवीर सुनीता विल्यम्स आणि त्यांचे सहकारी बुच विल्मोर यांना पृथ्वीवर परत आणणे आहे, अशी घोषणा नासाने केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, तांत्रिक कारणांमुळे स्पेसएक्सला केनेडी स्पेस सेंटर येथून क्रू-10 मोहिमेचे प्रक्षेपण पुढे ढकलावे लागल्यानंतर अवघ्या २४ तासांतच ही घोषणा करण्यात आली आहे.
सुनीता विल्यम्स आणि बुच विल्मोर गेल्या नऊ महिन्यांपासून अंतराळात अडकले आहेत. बोईंगच्या स्टारलाइनर अंतराळयानात फक्त आठ दिवसांसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात गेले होते, पण स्टारलाइनरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ते परत येऊ शकले नाहीत.
स्पेसएक्सचे क्रू-10 मिशन शुक्रवारी पहाटे लाँच होणार असताना, फाल्कन-९ रॉकेटच्या ग्राउंड सपोर्ट क्लॅम्प आर्ममध्ये तांत्रिक समस्या उद्भवली, यामुळे शेवटच्या क्षणी मिशन रद्द करावे लागले. नासाने सांगितले की, पुढील संभाव्य प्रक्षेपण शनिवारी होईल, पण ते तांत्रिक निरिक्षणानंतरच शक्य होईल.
२० मार्च नंतर अंतराळ स्थानकातून निघणार
जर यावेळी प्रक्षेपण यशस्वी झाले तर विल्यम्स आणि विल्मोर २० मार्च नंतर अंतराळ स्थानकातून पृथ्वीसाठी निघतील. या मोहिमेद्वारे, एक नवीन टीम देखील आयएसएसमध्ये पाठवली जाईल, यामध्ये नासाच्या अॅनी मॅकलेन आणि निकोल आयर्स, जपानच्या जेएक्सए एजन्सीच्या ताकुया ओनिशी आणि रशियाच्या रोसकॉसमॉस एजन्सीचे किरिल पेस्कोव्ह यांचा समावेश असेल.
यापूर्वी, नासाने दोन आठवडे आधीच क्रू-10 मोहीम सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. या मोहीमेसाठी डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांनी दबाव टाकला असल्याचे बोलले जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:37 14-03-2025
