स्टॅलिन सरकारनं ‘₹’ चं चिन्ह बदललं, निर्मला सीतारमण भडकल्या…

नवी दिल्ली : तामिळनाडू सरकारने २०२५-२६ च्या अर्थसंकल्पासाठी काही प्रचार साहित्य तयार केले आहे. यात त्यांनी भारतीय रुपयाच्या चिन्हाशी छेडछाड करत, ते तमिळ भाषेत केले आहे. स्टॅलिन सरकारच्या या कृत्यामुळे आता राजकारण तापले आहे.

यासंदर्भात बोलताना, हा राष्ट्रीय चिन्हाचा अनादर असल्याचे भाजपने म्हटले आहे. तर हा तमिळ भाषेचा सन्मान असल्याचे डीएमकेने म्हटले आहे.

“ही तर घातक मानसिकता…” –
स्टॅलिन सरकारच्या या कृत्यावर अर्थमंत्री निर्मला सीतारमण भडकल्या आहेत. त्या गुरुवारी म्हणाल्या, तामिळनाडू सरकारने रुपयाचे चिन्ह हटवले, त्यांचे हे पाऊल म्हणजे, घातक मानसिकतेचा संकेत आहे. यामुळे देशाची एकात्मता कमकुवत होते. एवढेच नाही, तर डिएमके केवळ एक राष्ट्रीय प्रतीकच नाकारत नाही, तर एका तमिळ तरुणाच्या सर्जनशील योगदानाकडेही दुर्लक्ष करत आहे.

फुटिरतानाद्यांना प्रोत्साहन मिळेल –
यासंदर्भात केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. यात, “ही एक घातक मानसिकता आहे. जी देशाच्या एकतेला कमकुवत करते आणि प्रादेशिक अभिमानाच्या नावाखाली फुटीरतावादी विचारांना प्रोत्साहन देते. भारतीय रुपयाचे चिन्ह आंतरराष्ट्रीय पातळीवरही चांगल्या प्रकारे ओळखले जाते. तसेच, जागतिक आर्थिक व्यवहारांमध्ये भारताची ओळख म्हणून काम करते. भारत यूपीआय वापरून सीमापार पेमेंटला प्रोत्साहन देत असतानाच, आपण खरोखरच आपल्या स्वतःच्या राष्ट्रीय चलन चिन्हाला कमी लेखले योग्य आहे?”

राष्ट्रीय एक्याला धोका –
केंद्रीय अर्थमंत्री म्हणाल्या, ”खरे तर, इंडोनेशिया, मालदीव, मॉरीशस, नेपाळ, सेशेल्स आणि श्रीलंकेसह अनेक देश आपले चलन अधिकृतपणे, ‘रुपया’ अथवा या नावाशी मिळत्या जुळत्या नावाने वापरतात.” त्या पुढे म्हणाल्या, “सर्व निवडून आलेले प्रतिनिधी आणि अधिकारी आपल्या राष्ट्राचे सार्वभौमत्व आणि अखंडता राखण्यासाठी संविधानांतर्गत शपथ घेतात. राज्याच्या अर्थसंकल्पीय कागदपत्रांमधून रुपयासारखे राष्ट्रीय चिन्ह काढून टाकणे हे त्या शपथेविरुद्ध आहे. यामुळे राष्ट्रीय एकात्मतेची वचनबद्धता कमकुवत होते.”

यावेळी, ”विडंबन म्हणजे, रुपयाचे चिन्ह डीएमकेचे माजी आमदार एन. धर्मलिंगम यांचे पुत्र डी उदय कुमार यांनी डिझाइन केले होते. आता हे नाकारत, डिएमके केवळ एका राष्ट्रीय प्रतिकच नाकारत नाही, तर एका तमिळ तरुणाच्या सर्जनशील योगदानाकडेही पूर्णपणे दुर्लक्ष करत आहे,” असेही सीतारामण म्हणाल्या.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:30 14-03-2025