चिपळूण : प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही चिपळूण तालुक्यातील धनगरवाड्यांना पाणी टंचाईची झळ बसू लागली आहे. प्रशासनाने टँकरद्वारे पाणी पुरवठा करावा यासाठी या वाड्यांतून अर्ज दाखल होवू लागले आहेत.
आतापर्यंत चार गावातील धनगरवाड्यांनी चिपळूण पंचायत समितीकडे अर्ज केले असून ते अर्ज पुढील कार्यवाहीसाठी तहसिलदार प्रवीण लोकरे यांच्याकडे पाठविण्यात आले आहेत. कोकणात पर्यायाने चिपळूण तालुक्यात मुबलक पाऊस कोसळतो. मात्र असे असले तरी अद्याप तालुका टँकरमुक्त झालेला नाही.
अलिकडच्या काही दिवसात कडक उन्हाळ्याच्या झळा बसू लागल्या आहेत. यामुळे नैसर्गिक पाण्याचे स्त्रोत तळ गाठू लागले आहेत. त्याचा मोठा फटका डोंगर, दुर्गम भागात असलेल्या धनगरवाड्यांना बसू लागला आहे. दिवसेंदिवस पाणी टंचाईच्या भीषण परिस्थितीला तोंड द्यावे लागत असल्याने या वाड्यांकडून टँकरद्वारे पाणी पुरवठ्याची मागणी होवू लागली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:28 14-03-2025
