शिवस्मृती मंडळच्या वतीने राजापूरात सोमवारी शिवजयंती

राजापूर : प्रतिवर्षाप्रमाणे शिवस्मृती मंडळ राजापूरच्या वतीने फाल्गुन कृष्णपक्ष तृतीया सोमवार दि. १७ मार्च रोजी जवाहरचौक येथील शिवस्मारकात तिथीनुसार शिवजयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

या निमित्त रविवार व सोमवार दोन दिवस वाहन फेरी, चित्ररथ मिरवणूक, युध्दकला प्रात्यक्षिक व राष्ट्रीय व्याख्याते श्रीनिवास पेंडसे प्रस्तृत ‘गर्जती सह्याद्रीचे कडे’ ही छत्रपती शिवाजी महाराजांची संगीत गौरव गाथा अशा विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

वाहनफेरीने या उत्सवाचा प्रारंभ होणार आहे. रविवार १६ मार्च रोजी सकाळी ९.३० वाजता सकाळी ९.३० वाजता धर्मध्वजाचे पूजन, सकाळी १० वाजता वाहनफेरी काढली जाणार आहे. हे वाहन फेरी एस. टी. डेपो येथुन प्रारंभ होवून पेट्रोलपंप, मेन रोड, जवाहरचौक छत्रपती संभाजी महाराज पेठ मार्गे वरचीपेठ राजीव गांधी स्टेडिअम बंदरधक्का, छत्रपती शिवाजी मार्ग, कै. वैशंपायन गुरूजी पुल मार्गे गुजराळी, चापडेवाडी, ओगलेवाडी, दिवटेवाडी, साखळकरवाडी, खडपेवाडी मार्गे पुन्हा शिवस्मारक येथे सांगता होणार आहे.

सायंकाळी ७ ते १० या वेळात गाथा शिवरायांची या अंतर्गत स्थानिक कलाकारांचे शिवचरित्रावरील विविध कलाविष्कारांचे सादरीकरण होणार आहे.

सोमवार दि. १७ मार्च रोजी सकाळी ८.३० वाजता छत्रपती शिवरायांच्या पूर्णाकृती मुर्तीची पाद्यपूजा, अभिषेक, पुष्पहार अर्पण केला जाणार आहे. त्यानंतर सायंकाळी ४ वाजता शिवकालीन चित्ररथ देखाव्यांसह छत्रपती शिवाजी शिवरायांचा पालखी सोहळा होणार आहे. यामध्ये पालखी, ढोलपथके, लेझीम पथक, झांज पथक यांसह शिवप्रेमी नागरिक सहभागी होणार आहेत.

रात्रौ ९.०० वाजता राष्ट्रीय व्याख्याते श्रीनिवास पेंडसे स्थानिक कलाकारांच्या सहभागातून छत्रपती शिवाजी महाराजांची संगीत गौरव गाथा सादर करणार आहेत. तरी यावेळी सर्व शिवप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन शिवस्मृर्ती मंडळ राजापूरच्या वतीने करण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:34 PM 14/Mar/2025