आक्षेपार्ह दृश्ये, फोटो, व्हिडीओ तसेच अफवा न पसरविण्याचे रत्नागिरी पोलिसांचे आवाहन

रत्नागिरी : कोणीही कोणत्याही प्रकारच्या समाजमाध्यमांवर ऐतिहासिक व थोर पुरुष, घटनात्मक उच्च पदावरील सन्माननीय व्यक्ती, राजकीय व्यक्ती अथवा इतर समाजातील व्यक्तींच्या संदर्भात भावना दुखावतील अशा अनुषंगाने आक्षेपार्ह पोस्ट करू नयेत. तसेच स्टेटस ठेवू नयेत, असे आवाहन जिल्हा पोलीस दलातर्फे समाजातील सर्व स्तरातील नागरिकांना केले आहे.

सोशल मीडियावर रत्नागिरी सायबर पोलीस ठाण्यामार्फत २४x७ निगराणी ठेवण्यात येत आहे. सोशल मीडियाद्वारे कोणत्याही धर्माबद्दल आक्षेपार्ह चित्र, पोस्ट, अफवा, चुकीचे संदेश अगर आक्षेपार्ह संदेश, व्हिडीओ प्रसारीत केल्यास रत्नागिरी पोलीस दलाकडून कडक कारवाई करण्यात येईल. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये अथवा बळी पडू नये.

फेसबुक, एक्स, इंस्टाग्राम, व्हाट्सअप अथवा युट्यूब या समाजमाध्यमांवर अशा आक्षेपार्ह पोस्ट/स्टेटस करणाऱ्या व्यक्तींचे रेकॉर्ड तयार होऊन त्यांच्यावर कारवाई होऊ शकते. त्यामुळे अशी समाजमाध्यमे वापरणारे तरुण व इतर यांनी आक्षेपार्ह पोस्ट करू नये व आक्षेपार्ह पोस्ट फॉरवर्ड करू नये अथवा लाईक करू नये.

अशाप्रकारच्या आक्षेपार्ह पोस्टमुळे गुन्हे दाखल होऊन संबंधितांना भारतीय न्याय संहिता, महिती तंत्रज्ञान कायदया नुसार कायदेशीर प्रक्रियेला सामोरे जाऊ लागू शकते. यातून तरुण व इतरांचे भवितव्य अडचणीत येऊ शकते. समाजमाध्यमांवरील आक्षेपार्ह पोस्ट स्वतःहून तात्काळ डिलीट कराव्यात अथवा फॉरवर्ड व लाईक करू नयेत. सोशल मीडियावर प्रसारीत करण्यात येणाऱ्या पोस्ट व वृत्तपत्रांमध्ये प्रसारित केल्या जाणाऱ्या बातम्या या प्रसारीत करण्यापूर्वी संबंधित विभागाकडून खात्री करूनच प्रसारीत करण्यात याव्यात.

सर्व समाजातील प्रतिष्ठितांना याद्वारे आवाहन करण्यात येते की, अशा प्रकारच्या आक्षेपार्ह संभ्रम पसरवणाऱ्या पोस्ट समाजमाध्यमामध्ये प्रसारीत होऊ नये म्हणून आपणांमार्फत आवश्यक व योग्य प्रयत्न करून जागृती करण्यात यावी. रत्नागिरी जिल्ह्यातील जातीय सलोखा राखण्यामध्ये पोलिसांना सहकार्य करावे, असेही आवाहन जिल्हा रत्नागिरी पोलीस दलातर्फे केले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:40 PM 14/Mar/2025