संगमेश्वर : कसब्यातील कर्णेश्वर मंदिरात सोनेरी किरणांचा अभिषेक

संगमेश्वर : तालुक्यातील कसबा या ऐतिहासिक गावात असणाऱ्या चालुक्यकालीन कर्णेश्वर मंदिरातील शिवलिंगावर १४ ते १८ मार्चदरम्यान सकाळी पावणेसात वाजता सोनेरी किरणांचा अभिषेक होणार आहे. शुक्रवारी (ता. १४) सकाळी सातच्या सुमारास सूर्यकिरणांनी श्री कर्णेश्वर मंदिराच्या गाभाऱ्यात प्रवेश करताच शिवलिंगावर पडलेली सूर्यकिरणे पाहून जणू सूर्याने शिवलिंगावर सोनेरी अभिषेक केल्याची अनुभूती भाविकांना घेता आली.

पूर्वीची मंदिरे उभारताना स्थापत्यशास्त्राचा अभ्यास किती प्रगत होता, याची अनुभूती अशा प्रसंगातून येते. कसबा येथील कर्णेश्वर मंदिर पूर्वाभिमुख असल्याने काही ठराविक कालावधीत मंदिराच्या प्रवेशद्वारासमोर सूर्य आल्यानंतर शिवलिंगावर असा किरणांचा सोनेरी अभिषेक होतो. हे मंदिर अप्रतिम शिल्पकलेसाठी प्रसिद्ध आहे. मंदिर प्रवेशद्वाराजवळ असलेल्या शिल्पात कोरलेले प्रसंग अचंबित करतात. या मंदिरातील दगडी झुंबरेदेखील अत्यंत नाजूक असून, शिल्पकारांच्या अद्भूत कौशल्याची साक्ष या नाजूक कलाकुसरीतून दिसून येते.

पाच दिवस विविध दिनविशेष
शुक्रवारी धूलिवंदन, १५ ला वसंतोत्सवारंभ, १६ ला संत तुकाराम महाराजांच्या त्रिशतकोत्तर अमृत महोत्सवी वैकुंठगमन वर्षाची सांगता (तुकाराम बीज), १७ ला संकष्टी चतुर्थी आणि तिथीनुसार शिवजयंती, अशा विविध दिनविशेष असलेल्या १४ ते १८ मार्च या काळात श्री कर्णेश्वरास सूर्यस्नानाचा अनुपम सोहळा होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:09 AM 15/Mar/2025