दापोली : डॉल्फिन सफरसाठी चाललेल्या करजगाव तामसतीर्थ येथील ग्रामस्थांनी जाळ्यात अडकलेल्या ऑलिव्ह रिडले जातीच्या ४ कासवांना वाचवून पुन्हा समुद्रात सोडले.
सोमवारी (ता. ११) सकाळी १० वाजता करजगाव तामसतीर्थ येथील संदीप मोरे हे इतर चौघांना घेऊन डॉल्फिन सफरीला जात होते. साधारण किनारपट्टीपासून १०० मीटरच्या अंतरावर मच्छीसाठी जाळी लावण्यात आली होती. तिथे काहीतरी तडफडताना दिसले म्हणून ते जवळ गेले असता त्यांना जाळ्यात अडकलेले कासव दिसले. त्यांच्यासोबत सलील मोरे, सनिज शिरधनकर, संजय शेट्ये, प्रवीण शेट्ये, बंड्या व प्रीतम बागकर होते, मात्र जाळे ओढल्यावर त्यामध्ये चार कासवं अडकलेली दिसून आली. त्यामुळे जाळे कापून कासवांना जाळ्यातून सोडवून फायबर बोटीत घेतले. त्यांना किरकोळ जखमा झाल्या होत्या. कारण दोघांच्या मानेभोवतीच जाळे अडकले होते, तर दोघांच्या पायात जाळे गुरफटले होते. कांदळवन कक्षाच्या मार्गदर्शनाखाली जाळ्यातून सोडवून खोल समुद्रात नेऊन सोडले. त्यांच्याबरोबर कासवमित्र संजय शेट्ये होते. या मादी कासव असून त्या किनाऱ्यावर अंडी घालायला येत असताना जाळ्यात अडकल्या असण्याची शक्यता या वेळी कासवमित्र शेट्ये यांनी व्यक्त केली, अशी माहिती संदीप मोरे यांनी दिली.
दापोलीतून ३८२ पिले समुद्रात
ऑलिव्ह रिडले जातीच्या मादी कासव दापोलीच्या किनारपट्टीला अंडी घालण्यासाठी सर्रास येतात. सध्या रत्नागिरी जिल्ह्यातील आंजर्ले-२७ घरटी २९८४ अंडी, दाभोळ-१२२ घरटी ११ हजार ७३७ अंडी, केळशी- ३५ घरटी ३६९१ अंडी, आडे-५ घरटी ५०५ अडी, कर्दे १० घरटी १११९ अंडी, कोळथरे-५१ घरटी ५२१२ अंडी, लाडघर-८ घरटी ८२१ अंडी, मुरूड-१६ घरटी १६५४ अंडी. या संरक्षित घरट्यातून आतापर्यंत दापोलीत ३८२ पिले समुद्रात सोडण्यात आली आहेत.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:17 AM 15/Mar/2025













