Raju Shetty: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प असणाऱ्या शक्तीपीठ महामार्गावरून पश्चिम महाराष्ट्रात राजकीय वातावरण तापलं आहे. स्थानिक शेतकऱ्यांचा या महामार्गाला विरोध असल्याचं सांगत स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून आक्रमक भूमिका घेण्यात आली आहे.
मात्र तरीही प्रशासनाकडून या मार्गाच्या कामासंबंधी हालचाली वाढल्याने स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रमुख राजू शेट्टी यांच्या नेतृत्वात आज सांगली-कोल्हापूर मार्गावर रास्तारोको आंदोलन करण्यात येणार होते. परंतु या आंदोलनाआधीच पोलीस प्रशासनाने राजू शेट्टी यांना त्यांच्या निवासस्थानातून ताब्यात घेतलं आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं दिलेल्या आंदोलनाच्या इशाऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज सकाळीच पोलीस राजू शेट्टी यांच्या शिरोळ येथील निवासस्थानी दाखल झाले. त्यानंतर काही वेळातच शेट्टी यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. तसंच शेतकरी संघटनेच्या इतर काही कार्यकर्त्यांनाही ताब्यात घेण्यात आल्याचे समजते.
शक्तीपीठसाठी मुख्यमंत्री आग्रही
स्थानिक शेतकरी आणि विविध राजकीय पक्षाच्या नेत्यांचा या महामार्गाला विरोध असला तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मात्र या मार्गासाठी आग्रही आहेत. “शक्तीपीठ मार्ग महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा प्रकल्प आहे. हा महामार्ग नागपूरपासून सिंधुदुर्गपर्यंत १२ जिल्ह्यांमधून जाणार असून, महाराष्ट्रातील महत्त्वाच्या शक्तीपीठांना जोडणारा आहे. त्यामुळे मराठवाडा, विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्राच्या औद्योगिक तसेच आर्थिक विकासालाही चालना मिळणार आहे,” असं नुकत्याच झालेल्या विधिमंडळाच्या अधिवेशनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.
शेतकऱ्यांचे समर्थन आणि चर्चा
मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितलं की, “कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांनी स्वतःहून या महामार्गासाठी जागा देण्याची तयारी दाखवली आहे. कोल्हापूरच्या एअरपोर्टवर एक हजार शेतकऱ्यांचे निवेदन प्राप्त झाले, ज्यात महामार्गाचे समर्थन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेण्यासाठी चर्चा करू, त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्रयत्न करू. पण हा महामार्ग महाराष्ट्राच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचा असून तो होणारच,” असा दावा मुख्यमंत्र्यांनी केला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 15-03-2025













