सोलापूर : इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची ११ फेब्रुवारीपासून तर दहावीच्या विद्यार्थ्यांची २१ फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू आहेत. परीक्षा नेहमीपेक्षा १० दिवस अगोदर सुरू झाल्याने निकाल देखील १५ मेपूर्वीच जाहीर केला जाणार आहे. पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या विभागीय मंडळांकडून तपासलेल्या उत्तरपत्रिकांचा आढावा अधिकारी दररोज घेत आहेत.
बारावीच्या विद्यार्थ्यांचा माहिती तंत्रज्ञान (आयटी) विषयाचा पेपर राहिला असून दहावीच्या विद्यार्थ्यांचेही दोन पेपर बाकी आहेत. १७ मार्च रोजी परीक्षा संपणार आहे. तत्पूर्वी, ज्या विषयांचे पेपर झाले आहेत, त्याच्या उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेत व्हावी, यासाठी दररोज शाळेच्या वेळेत विषय शिक्षकाने किमान ३५ उत्तरपत्रिका तपासाव्यात, असे सांगण्यात आले आहे. दुसरीकडे उत्तरपत्रिका तपासणीवर नेहमीप्रमाणे शिक्षक संघटनांचा बहिष्कार नसल्याने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल १५ मेपूर्वीच जाहीर होतील, अशी माहिती बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
‘त्या’ विद्यार्थ्यांना सरासरी गुण
विरार पश्चिम भागातील एका शिक्षिकेच्या घराला आग लागून बारावीतील वाणिज्य शाखेच्या १७५ विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्या. वाणिज्य संघटन व व्यवस्थापन (ओसी) या विषयाच्या त्या उत्तरपत्रिका होत्या. बोर्डाच्या नियमांनुसार उत्तरपत्रिका जळालेल्या विद्यार्थ्यांना अन्य विषयांमध्ये मिळालेल्या गुणांच्या सरासरीवरून त्या विषयासाठी गुण दिले जाणार आहेत.
उत्तरपत्रिका घरी नेल्याच्या तक्रारीनंतर चौकशीअंती संबंधित शिक्षकासह शाळेच्या मुख्याध्यापकावर कारवाई केली जाते. वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उत्तरपत्रिकांची तपासणी गतीने सुरू असून दोन्ही इयत्तांचे निकाल १५ मेपर्यंत जाहीर होतील, असे नियोजन आहे. – औदुंबर उकिरडे, विभागीय सचिव, महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, पुणे
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:02 PM 15/Mar/2025














