Bank Strike : बँक कर्मचाऱ्यांचा देशव्यापी संप; सलग 4 दिवस बंद राहणार बँका

Bank Strike : बँकेशी निगडीत काही कामे असणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी समोर आली आहे. 4 दिवस बँका बंद राहणार आहेत. युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्स (UFBU) दिलेल्या माहितीनुसार, विविध मागण्यांसाठी कर्मचारी संघटनांनी 24 आणि 25 मार्च रोजी दोन दिवसांचा देशव्यापी संप पुकारला आहे.

कर्मचारी संघटनेच्या प्रमुख मागण्यांबाबत इंडियन बँक्स असोसिएशन (IBA) सोबत झालेल्या चर्चेचा कोणताही सकारात्मक परिणाम झाला नाही, असे UFBU ने म्हटले आहे.

IBA सोबतच्या बैठकीत, UFBU सदस्यांनी सर्व कॅडरमध्ये भरती आणि पाच दिवसांच्या कामाच्या आठवड्यासह अनेक मुद्दे उपस्थित केले. बैठक होऊनही प्रमुख समस्यांचे निराकरण झालेले नाही. नऊ बँक कर्मचारी संघटनांच्या युनिफाइड बॉडी यूएफबीयूने या मागण्यांसाठी यापूर्वी संपाची घोषणा केली होती. प्रमुख मागण्यांवर एकमत होऊ शकले नाही.

कोणत्या मागण्यांसाठी संप होणार?

सरकारी बँकांमधील रिक्त पदे भरावीत :

कर्मचारी व अधिकाऱ्यांच्या पदांवर तातडीने नियुक्त्या करण्यात याव्यात.

कार्यप्रदर्शन पुनरावलोकन आणि प्रोत्साहन योजना मागे घ्याव्यात:

युनियन्सचे म्हणणे आहे की डिपार्टमेंट ऑफ फायनान्शियल सर्व्हिसेस (DFS) ने जारी केलेल्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमुळे नोकरीची सुरक्षा धोक्यात आली आहे.

बँकांच्या कामकाजात “सूक्ष्म-व्यवस्थापन” वर बंदी घालावी:

UFBU ने आरोप केला आहे की सरकारी बँक मंडळांच्या स्वायत्ततेवर परिणाम होत आहे.
ग्रॅच्युइटी कायद्यात सुधारणा: ही मर्यादा ₹ 25 लाखांपर्यंत वाढवली जावी, जेणेकरून ती सरकारी कर्मचाऱ्यांच्या योजनेच्या बरोबरीने असेल आणि त्याला आयकरातून सूट मिळेल.

आयबीएशी संबंधित उर्वरित प्रलंबित प्रश्न मार्गी लावावेत.

सलग 4 दिवस बँका बंद राहणार

युनायटेड फोरम ऑफ बँक युनियन्सनुसार, 24 आणि 25 मार्च रोजी देशभरातील 9 बँका संपावर जाणार आहेत. तर 22 मार्चला चौथा शनिवार आणि 23 मार्चला रविवार असल्याने बँका सलग 4 दिवस बंद राहतील. तुम्हाला बँकेशी संबंधित कोणतेही काम करायचे असल्यास ते 22 मार्चपूर्वी पूर्ण करावे. सर्वसामान्यांसोबतच छोट्या-मोठ्या व्यावसायिकांनाही अडचणींचा सामना करावा लागतो. सलग चार दिवस बँका बंद राहिल्याने देशाला मोठा आर्थिक फटका बसण्याची खात्री आहे. त्यामुळे सरकारी तसेच सर्वसामान्यांचे काम विस्कळीत होणार आहे. बँकांच्या चार दिवसांच्या संपाचा देशातील व्यावसायिक कामकाजावर विपरीत परिणाम होणार आहे.

बँका बंद असल्याने एनईएफटीद्वारे होणारे व्यवहार ठप्प होणार

दररोज व्यापारी, सेवा पुरवठादार, कॉर्पोरेट हाऊसेस, उद्योग, छोटे व्यापारी आणि इतर क्षेत्रे बँकिंग प्रणालीचा वापर करतात. याचा त्यांच्या बँकिंग कामकाजावर विपरीत परिणाम होईल.
बँका बंद असल्याने एनईएफटीद्वारे होणारे व्यवहार ठप्प होणार आहेत. त्यामुळे मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. या संपामुळे चेक क्लिअरन्स, एटीएमचे कामकाज यासह अनेक महत्त्वाच्या सेवा विस्कळीत होणार आहेत.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:18 15-03-2025