खेड : खेड तालुक्यातील आंबडस ते काडवली रस्त्याची दुरवस्था झाली आहे. तसेच या मार्गावरील पुलावर खड्डेच खड्डे असून या पुलावरून वाहने चालविणे वाहनचालकांना जिकरीचे बनले आहे. यामुळे या मार्गावरील रस्त्याचे डांबरीकरण होण्याबरोबरच नव्याने पूल बांधण्यात यावा, अशी मागणी होत आहे.
पंधरागावकडे जाण्यासाठी आंबडस-काडवली हा महत्त्वाचा मार्ग मानला जातो. मात्र, या मार्गावरील रस्त्याची दुरवस्था झाली असून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत. उन्हाळ्यात खड्डे बुजवून मलमपट्टी करण्यात आली. मात्र, खड्डे बुजविण्याचे काम तकलादू ठरले आहे. यामुळे खड्ड्यांमधूनच वाहन चालकांना आपली वाहने चालवावी लागत आहेत. याचा त्रास होत असून या रस्त्याचे डांबरीकरण व्हावे, अशी मागणी होत आहे. काही दिवसांपूर्वी या रस्त्याच्या देखभाल दुरुस्तीसाठी कोट्यवधी रुपयांची निविदा प्रसिद्ध झाली असल्याची माहिती मिळत असून देखभाल दुरुस्तीवर कोट्यवधी रुपयांचा चुराडा करण्यापेक्षा या रस्त्याचे डांबरीकरणच करण्यात यावे, असा सूर वाहनचालकांमधून लावला जात आहे. याच मार्गावर केळणे फाट्याजवळ नदीवर पूल असून या पुलाला बरीच वर्षे झाली आहेत. विशेष म्हणजे हा हा पूल अरुंद असल्याने एकाचवेळी दोन वाहने ये-जा करू शकत नाहीत तर आता या पुलावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून वाहनचालकांना कसरत करावी लागत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:43 18-09-2024