खेड : नाम फाऊंडेशन देखील दोन दिवसांत जगबुडीचा गाळ काढणार असल्याने दुप्पट वेगाने काम सुरू होईल, अशी माहिती ना. योगेश कदम यांनी माध्यमांना दिली.
खेड तालुक्यातील शिवतर येथे शनिवार १५ रोजी एका कार्यक्रमासाठी आलेले गृहराज्य मंत्री ना. योगेश कदम यांना जगबुडी नदीतील गाळ काढण्याच्या कामाबाबत विचारलेल्या प्रश्नांवर बोलताना ना. कदम म्हणाले, खेड शहराला जगबुडी नदीला आलेल्या पुराचे पाणी पूर्णपणे शहरामध्ये शिरून नुकसानीला सामोर जावे लागत होते. ही समस्या सोडवण्यासाठी आपण जवळपास पावणेतीन कोटींचा निधी जगबुडी नदीतील गाळ काढण्यासाठी मंजूर करून घेतला आहे. त्या कामाला सुरुवात देखील केलेली आहे. पुढचे दोन तीन महिने हे काम चालू राहणार आहे. आता तिथे दोन मशीन काम करत आहेत.
नाम फाउंडेशन सोबत देखील आपण ही समस्या सोडवण्यासाठी मदत मागितली होती. त्यांनी देखील मदतीची तयारी दर्शवली असून सध्या काम करत असलेल्या दोन यंत्रांच्या सोबत दोन दिवसांत आणखी दोन यंत्र नाम फाऊंडेशन मार्फत तेथे कार्यरत केली जाणार आहेत. त्यामुळे दुप्पट वेगाने गाळ काढण्याचे काम होईल. खेड शहराला या वर्षी पुराच्या पाण्याची समस्येचा सामना करावा लागू नये, असे आमचे प्रयत्न आहेत, असे ते म्हणाले.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:17 AM 17/Mar/2025














