दापोलीत पाणीटंचाईचे सावट गडद..

दापोली : फेब्रुवारीपासून वाढलेल्या उन्हाच्या झळांमुळे तालुक्यात पाणी टंचाईचे सावट गडद झाले आहे. मार्च ते एप्रिल महिन्यात आटणाऱ्या नद्या यावर्षी फेब्रुवारीतच आटल्या आहेत. तर सार्वजनिक नळपाणी योजनांच्या विहिरींनी आतच तळ गाठला आहे. त्यामुळे या वर्षी दापोली तालुक्यातील जनतेला पाणी टंचाईचा भीषण सामना करावा लागेल, असे चित्र आहे.

गावे टँकरमुक्त व्हावीत, यासाठी दरवर्षी शासनाचा खटाटोप असतो. दरवर्षी पाण्यासाठी करोडो रुपये खर्च होतात. ग्रामपंचायत स्तरावर वित्त आयोगातून पाण्यासाठी वेगळी तरतूद असते. विहिरींची पाण्याची पातळी पाऊस पडेपर्यंत टिकून राहावी म्हणून बंधारे मोहीम राबवली जाते. मात्र, शासन पातळीवरून राबवल्या जाणाऱ्या असंख्य योजना शेवटी फोल ठरल्याचे बोलले जात आहे.

पाण्यासाठीची वणवण थांबावी, या साठी शासनाने जलजीवन मिशन ही योजना सर्वत्र राबवली. सुरुवातीला या योजनेचा जोम दिसला. अनेक गावांतून या योजनेवर कोट्यवधीची तरतूद आहे. तर अनेकांनी लाखोंच्या योजना रिवाईज करून कोर्टाच्या केल्या आहेत.

तालुक्यात १५७ गावांसाठी १७७कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे. मात्र, या योजनेला पूरक निधी मिळत नसल्याने तालुक्यात सर्वच ठिकाणी या योजनेची कामे अपूर्ण आहेत. तीन वर्षे या योजनेचे रडगाणे सुरू आहे. तर पूर्वीच्याच योजनांच्या माध्यमातून पाणी पुरवठा सुरू आहे.

जलजीवन योजनेची कामे झपाट्याने व्हावीत म्हणून आढावा बैठकी होत आहेत. तर अपूर्ण योजना लवकर पूर्ण व्हाव्यात, म्हणून नागरिकांचादेखील रेटा आहे. मात्र, निधी मिळत नसल्याने ठेकेदारांनीही हात टेकले आहेत. निधीअभावी जलजीवनचे हे ही वर्ष फुकट जाणार, असे चित्र आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 17/Mar/2025