खेड : दोन लाखांची खंडणी मागणाऱ्या संशयिताला न्यायालयीन कोठडी

खेड : ‘तू दारूचा धंदा करतोस, आताच्या आता २ लाख आणि दरमहा दहा हजार रुपये दे’ असे धमकावत ६० हजार रुपयांची खंडणी उकळल्याप्रकरणी लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचा जिल्हा उपाध्यक्ष अब्दुल्ला हुसैन नाडकर (वय ५६, रा. संगलट खेड) याच्यावर गुन्हा दाखल केला होता. त्याला आज खेड येथील न्यायालयात हजर केले असता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणातील अन्य तिघे संशयित अद्यापही फरार आहेत.

खेड पोलिस त्यांचा शोध घेत आहेत. ही घटना १४ सप्टेंबर २०२४ ला घडली. याबाबत प्रकाश महादेव महाडिक (रा. संगलट, खेड) यांनी १३ मार्चला येथील पोलिसात तक्रार दाखल केल्यानंतर गुन्हा दाखल केला होता.

यातील संशयित हा मोटारीमधून (क्र. एमएच ०४ एफ. आर. १९९९) फिर्यादीच्या घरी गेला होता. आपण लोककल्याण ग्राहक संरक्षण संस्थेचा मोठा साहेब असल्याची बतावणी करत या संशयिताने दोन लाख रुपयांची खंडणी मागितली; मात्र एवढी रक्कम नसल्याचे फिर्यादीने सांगितल्यावर त्याने १ लाख रुपयांची खंडणी मागितली. ही रक्कम देण्यास नकार दिल्यानंतर शिवीगाळ करत त्याने शहरातील महाडनाका येथील कार्यालयात ६० हजार रुपये घेऊन ये, असे दरडावत कोणाला सांगितल्यास सोडणार नाही, अशी धमकी फिर्यादीला दिली होती. या प्रकरणी संशयित आरोपी अब्दुल्ला नाडकर याच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्यानंतर त्याला खेड पोलिसांनी अटक केली. न्यायालयात हजर केले असता त्याला पंधरा दिवसाची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
01:57 PM 17/Mar/2025