संगमेश्वरातील ट्रामा केअर सेंटरमध्ये महत्त्वाची पदे रिक्त

संगमेश्वर : मुंबई-गोवा महामार्गावर संगमेश्वर-कसबानजीक ग्रामीण रुग्णालय आणि त्याच इमारतीसमोर ट्रामा केअर सेंटर उभारण्यात आले आहे. संगमेश्वर परिसरातील सुमारे ९५ गावांतील सर्वसामान्य ग्रामस्थांना या संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयाचा महत्त्वाचा आधार आहे. महामार्गावरील अपघातग्रस्तांवर तातडीचे उपचार व्हावेत यासाठी अत्याधुनिक ट्रामा केअर सेंटरची निर्मिती करण्यात आली आहे; मात्र, गेली अनेक वर्षे या ट्रामा केअर सेंटरमधील महत्त्वाची पदे रिक्त आहेत.

अनेक पदे रिक्त असल्याने अन्य कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. वैद्यकीय अधीक्षक, वैद्यकीय अधिकारी या महत्त्वाच्या पदांसह तब्बल १२ पदे रिक्त आहेत. या रिक्त पदांअभावी रुग्णसेवाच ‘आजारी’ पडली आहे. महत्त्वाच्या वैद्यकीय अधीक्षक आणि वैद्यकीय अधिकारी तसेच तांत्रिक पदे रिक्त असल्यामुळे येथील सोनोग्राफी मशिनरी पडून आहे. ग्रामीण रुग्णालय ग्रामस्थांसाठी आधार ठरत असूनही, अस्थायी स्वरूपाच्या पदांव्यतिरिक्त कायमस्वरूपी डॉक्टरांची भरता करण्यात आलेली नाही. त्यामुळे कार्यरत डॉक्टरांना अतिरिक्त भार सोसावा लागत आहे.

अत्यावश्यक सेवा देताना अनेक अडथळे येतात. ग्रामीण रुग्णालयाची ही अवस्था असतानाच लाखो रुपये खर्चुन उभारलेल्या ट्रामा केअर सेंटरचीही तीच परिस्थिती आहे. संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरण्यात यावीत तसेच आरवली ते बावनदी हा ३६ किमीचा राष्ट्रीय महामार्ग अपघातप्रवण क्षेत्र म्हणून ओळखला जातो. या क्षेत्रात होणारे अपघात लक्षात घेता येथे सेंटरची उभारणी करण्यात आली; मात्र आवश्यक तेवढा तज्ञ कर्मचारीवर्ग अद्यापही न दिल्याने सेंटर असून नसल्यासारखेच आहे अशी स्थिती पाहायला मिळते

दिवसात ७० हून अधिक रुग्ण तपासणी
संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयावर परिसरातील अनेक गावातील रुग्ण अवलंबून आहेत. एका दिवसाला येथे ७० पेक्षा अधिक बाहारुग्णांची तपासणी होते. तालुक्याचा विस्तार मोठा असल्याने आजूबाजूच्या गावातून अधिक उपचारासाठी नागरिक संगमेश्वर ग्रामीण रुग्णालयावरच अवलंबून असतात. अशावेळी येथे तज्ज्ञ डॉक्टरांसह आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:05 PM 17/Mar/2025