श्रीदेव भैरीच्या धुळवडीत हिंदू-मुस्लिम ऐक्याचे दर्शन

रत्नागिरी : ग्रामदैवत श्री देव भैरी-श्री देवी जोगेश्वरी यांचा शिमगोत्सव सुरू आहे. शुक्रवारी (ता. १४) रात्री धूळवड साजरी करण्यात आली. राजिवडा येथे मुस्लिम समाजातील मानकरी अश्फाक काद्री कुटुंबीय व देवस्थानचे अध्यक्ष मुत्रा सुर्वे आणि सर्व ट्रस्टींनी गळाभेट घेतली.

शुक्रवारी दुपारी झाडगाव सहाणेजवळ होळी उभी राहिली आणि रात्री धूळवड खेळण्यासाठी निशाण पाठवण्यात आले. रात्री ९ वाजता धूळवड साजरी करण्यासाठी श्रीदेव भैरीची निशाण सहाणेवरून निघून पटवर्धन यांच्या घरापर्यंत जाऊन फिरून आले. देवस्थानचे मुख्य खोत रमाकांत गोपाळ सांवत व संतोष आत्माराम सावंत यांच्या घरी नेण्यात आले. तिथे पूजा होऊन निशाण श्रीदेवी जोगेश्वरी मंदिरात नेण्यात आले.

निशाण ठरलेल्या मागनि ढमालनीच्या पारावर येऊन निशाणाचे तीन भाग केले. एक भाग भैरी मंदिरामध्ये, दुसरा भाग तेलीआळीत रसाळ यांचे घरी तिठ्यावर, तिसरा भाग राजिवडा येथील श्रीदेव विश्वेश्वर मंदिरात गेले. तेथे श्रीदेव विश्वेश्वराच्या हद्दीत फिरून श्रीदेव विश्वेश्वराच्या मंदिरामध्ये गाऱ्हाणे झाले व निशाण बाहेर पडले. तेथून राजिवड्यातील चव्हाण यांच्या घराशेजारी गेले. तिथे मुस्लिम मानकरी काद्री यांना देवस्थानकडून श्रीफळ देऊन गळाभेट होऊन व तेथे धूळवड साजरी झाली.

यावेळी हिंदू-मुस्लिम ऐक्य पाहायला मिळाले. त्यानंतर निशाण मांडवी येथे वारंग यांच्या घरी रात्री थांबले. काल सकाळी ही निशाण सिद्धेश्वर विरेश्वर चव्हाट्याजवळ गाऱ्हाणे होऊन धूळवड आंबुलकर यांच्या घरी जाऊन तिथे धुळवडीचे दोन भाग झाले. मुरूगवाडा हद्दीजवळ जाऊन तिथे गाऱ्हाणे होऊन धूळवड परत मागे फिरून झाडगांव सहाणेजवळील झाडगावकर (दिवटीवाले मानकरी) यांच्या कंपाऊंडमध्ये दुपारी आले व धुळवडीचा कार्यक्रम संपला.

शिमग्याची १९ ला रंगपंचमीने सांगता
१५ ते १८ मार्च दुपारी १२ वाजेपर्यंत श्रीदेव भैरीची पालखी झाडगाव सहाणेवर भाविकांच्या दर्शनासाठी स्थानापन्न राहील. या तिन्ही रात्री १० ते १२ वाजेपर्यंत प्रत्येक वाडीतर्फे पारंपरिक पद्धतीत पालखी नाचविण्याचा कार्यक्रम होईल. १८ ला दुपारी १२ वा. श्रीदेव भैरीची पालखी मुरूगवाड्यात ग्रामप्रदक्षिणेसाठी जाईल व रात्री १० वाजता झाडगाव सहाणेवर येईल. १९ मार्चला रंगपंचमीला श्रीदेव भैरीची पालखी रंग खेळण्यासाठी दुपारी १ वाजता सहाणेवरून निघणार आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
02:36 PM 17/Mar/2025