पर्यावरणाचा र्‍हास होईल असे प्रकल्प कोकणात होऊ देणार नाही : उपमुख्यमंंत्री अजित पवार

रत्नागिरी : सिंधुदुर्गपासून रत्नागिरी, रायगडपर्यंत उद्योगांसह कोकणचा पर्यटन विकास झाला पाहिजे. सेमी कंडक्टर आणि हत्यारे बनवणारे पर्यावरणपूरक प्रकल्प येऊ घातले आहेत. पर्यावरणाचा समतोल राखून विकास झाला पाहिजे. कोकणात पर्यावरणाचा र्‍हास होईल, असे प्रकल्प आपण होऊ देणार नाही, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

रत्नागिरी येथे एमआयडीसी आणि टाटा टेक्नॉलॉजी संचलित कौशल्यवर्धन केंद्राच्या पायाभरणी समारंभाप्रसंगी ते बोलत होते. या ठिकाणी 197 कोटी खर्च करून हे कौशल्यवर्धन केंद्र उभे राहत असून, यात 31 कोटी राज्य सरकार तर 165 कोटी टाटाकडून दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. रत्नागिरी कालानुरूप बदलत आहे. मिर्‍या-नागपूर हायवेमुळे अनेक चांगले परिणाम भविष्यात दिसून येतील, असे त्यांनी सांगितले. विमानतळाच्या टर्मिनलचे काम अंतिम टप्प्यात सुरू आहे. त्यामुळे लवकरच विमाने उतरतील, त्यामुळे पर्यटनालाही फायदा मिळेल. उद्योजकही येतील त्याचा फायदा उद्योगधंदे वाढीसाठी होईल, असा विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला.

सध्या तंत्रज्ञान युग असून उद्योगापासून जगात, देशात, राज्यात विविध तंत्रात सातत्याने बदल होताना दिसत आहेत. त्यादृष्टीने आता विद्यार्थ्यांनी घडले पाहिजे. पूर्वी शाळा, महाविद्यालयातील शिक्षणावर भर होता. आज स्पर्धात्मक युगात तांत्रिक प्रशिक्षण ही काळाची गरज बनली आहे. अशी केंद्र तयार होणे आवश्यक आहे. राज्यातील हे तिसरे केंद्र आहे. यापूर्वी चंद्रपूर, त्यानंतर नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्यात आणि आता रत्नागिरीत कौशल्यवर्धन केंद्राची उभारणी केली जात आहे. रतन टाटा आता ह्यात नसले तरी टाटा समुहाकडून अशी केंद्र उभारण्याचे काम सुरु आहे. रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे. त्यांनी विद्यार्थ्यांना न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. भविष्यात कल्याण डोंबवली, पुणे, शिर्डी, मराठवाडयात संभाजीनगर, बुलढाणा अशी केंद्र केली पाहिजेत असे त्यांनी सांगितले.

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, उद्योगमंत्री यांचे अनेक उद्योगपतींशी संबंध येत असतात, त्यावेळी गुंतवणूक व इन्फ्रास्ट्रक्चरवर चर्चा होत असते, त्याचप्रमाणे तंत्रज्ञान आधारीत कुशल मनुष्यबळाची गरज व्यक्त केली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. अशा कौशल्यवर्धन केंद्रांमुळे भविष्यात सुक्ष्म, लघू, मध्यम व मोठ्या प्रकल्पांसाठी आवश्यक असणारा रोजगार निर्मिती होण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. अशा कौशल्यवर्धन केंद्रांमुळे तरुणांना संधीचे सोने करण्याची व रोजगाराची दारे उघडण्याची संधी मिळाली आहे. रत्नागिरीत कौशल्य विकसित करुन जगाच्या पाठीवर कोठेही जाऊ शकतो किंवा स्वत:चे स्टार्टअपही सुरु करु शकतो असे त्यांनी सांगितले.

यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, कौशल्यवर्धन केंद्र वर्षभरात पूर्ण होईल, याठिकाणी एकावेळी सात हजार प्रशिक्षणार्थी नऊ अभ्यासक्रमात 20 कोर्सचे प्रशिक्षण घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. सध्या शहरात कामे सुरु असल्याने अस्ताव्यस्त दिसत आहे परंतु वर्षभरात रत्नागिरी सुंदर दिसेल असा विश्वासही ना. सामंत यांनी व्यक्त केला. यावेळी खा. तटकरे यांनीही शहराच्या बदल आपल्या भाषणातून टिपले. कोकणातील स्थलांतर रोखण्यासाठी हे कौशल्यवर्धन केंद्र उपयुक्त ठरेल असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. उदय सामंत, रायगड-रत्नागिरीचे खासदार सुनील तटकरे, आमदार शेखर निकम, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंग, टाटाचे अनिल केलापुरे, पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी, मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या कार्यक्रमापूर्वी चंपक मैदानाजवळील कौशल्यवर्धन केद्राच्या जागेवर ना. अजितदादा पवार यांच्या हस्ते पायाभरणी समारंभ करण्यात आला.

उद्योगमंत्री उदय सामंत यांचे केले अजित पवारांनी कौतुक
रत्नागिरी बदलत असून, पर्यटन वाढीसाठी शिवसृष्टीसारखे अनेक प्रकल्प सुरू आहेत. मंत्री सामंत यांच्या कारकिर्दीत रत्नागिरीत मोठे बदल झाले असल्याचे कौतुकही राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.

मुंबई – गोवा महामार्ग रखडल्याची खंत
कोकणात रेवस ते रेडी हा ग्रीनफिल्ड महामार्ग होणार आहे. यामुळे पर्यटनाच्या अनेक संधी निर्माण होणार आहेत. परंतु, मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले असल्याची खंत अजित पवार यांनी व्यक्त केली. हा महामार्ग लवकर पूर्ण करण्याच्या द़ृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. या पूर्वी रवींद्र चव्हाण यांच्यावर जबाबदारी होती, आता छत्रपती शिवेंद्रराजे यांच्यावर महामार्गाची जबाबदारी देण्यात आली असल्याचे त्यांनी सांगितले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:50 18-03-2025