मंडणगड : मंडणगड पंचायत समिती पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून तालुक्यातील पाणी टंचाईच्या समस्येवर उपाययोजना करण्यासाठी पाणीटंचाई कृती आराखडा तयार करण्यात यंदा विलंब झाला. यात तालुक्यातील ३१ गावांतील ३७ वाड्यांचा समावेश करण्यात आला आहे.
मार्च महिन्याचा विलंब लक्षात घेता दोन टप्प्यात याकरिता काम केले जाणार आहे. जानेवारी महिन्यात तयार होणारा टंचाईकृती आराखडा विविध कारणांनी यंदा विलंबाने झालेला असला तरी समस्येच्या वास्तवाशी जवळीक साधणारा आहे. समस्येवरील विविध प्रकारचे नियोजन यंदा तालुक्याला टँकरने पाणी पुरवठ्यापासून दूर ठेवण्यात यशस्वी होईल, अशी अपेक्षा आहे. टंचाई दूर करण्यासाठी नवीन विधन विहीर खणणे, जुन्या नळपाणी योजनांची दुरुस्ती करणे, तात्पुरत्या नळपाणी पुरवठा योजना सुरु करणे व आवश्यकता भासल्यास टँकरचा पाणी पुरवठा करण्यासाठीही निधीचे नियोजन करण्यात आले आहे.
तीव्र टंचाईच्या काळात तालुक्यातील पाच गावातील सात वाड्यांवर दरवर्षी टँकरने पाणी पुरवठा करावा लागतो. विविध नळपाणी योजनांची सातत्याने अंमलबजावणी करुनही पाण्याची गैरसोय दूर झालेली नसल्याची तक्रार तालुकावासियांमधून नेहमीच होत असते. यावर यंत्रणा मात्र सगळे काही आलबेलं असल्याचे सांगत असते, नागरिकांच्या तक्रारी व समस्या यांचा कधीच मेळ बसत नाही.
टंचाई आराखडयात १३ गावातील १४ वाड्यांमध्ये नवीन विधन विहीर प्रस्तावीत, १ गावातील १ वाडीवर विंधन विहीर दुरुस्तीचे काम प्रस्तावीत, १० गावातील १३ वाड्यांवर नळयोजना दुरुस्तीची कामे प्रस्तावीत, ५ गावातील ६ वाड्यांवर तात्पुरत्या पुरक नळपाणी योजनेचे काम प्रस्तावीत आहे. २ गावातील ३ वाड्यांवर टँकरने पाणी पुरवठा कामाचे प्रस्ताव नियोजीत करण्यात आले आहे.
तालुक्यातील नागरिकांनी पाण्याचा अतिवापर टाळावा, पाण्याचे योग्य नियोजन करावे, असे आवाहन यंत्रणेच्यावतीने करण्यात आले आहे.
पेयजलची कामे चुकीच्या पद्धतीने होत असल्याच्या तक्रारी
राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रमांर्तगत योजनेची तालुक्यातील ८० हुन अधिक गावांत प्रभावी अंमलबजावणी करीत आहे. या योजनेचे काम चुकीच्या पद्धतीने होत असल्याच्या तक्रारी अनेक गावांमधून होत आहेत. त्यामुळे यापुढील काळात या यादीत आणखीन भर पडण्याची शक्यता आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:24 AM 18/Mar/2025














