चिपळूण : सक्शनपंपाने वाळू उत्खनन हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी सक्शनपंप लावून अवैध वाळू उत्खनन सुरू आहे त्या सर्व ठिकाणचे सक्शन पंप तहसीलदारांनी तत्काळ काढून टाकावे. अन्यथा संबंधित तहसीलदारांचे निलंबन करून त्यांच्यावर कारवाई केली जाईल, अशी घोषणा महसूलमंत्री बावनकुळे यांनी विधानसभा सभागृहात केली. आमदार भास्कर जाधव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर त्यांनी ही माहिती दिली.
राज्य सरकारच्या अधिवेशनात सोमवारी राज्याच्या वाळू धोरणावर चर्चा सुरू असतानाच आमदार भास्कर जाधव यांनी चर्चेत भाग घेऊन कोकणासह अन्य ठिकाणी सुरू असलेल्या सक्शन पंप वाळू उपशाबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले. कोकणात हातपाटी वाळू उपसा हा पारंपरिक व्यवसाय आहे. त्याला आमचा विरोध नाही. परंतु, अनेक ठिकाणी सक्शनपंप लावून मोठ्या प्रमाणात वाळू उत्खनन केले जात आहे. त्याला फक्त वाळू व्यावसायिक नव्हे, तर सरकारी कर्मचारीदेखील जबाबदार आहेत. सरकारी अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वरदहस्ताशिवाय कोणतेही अवैध धंदे चालू शकत नाहीत. त्यामुळे सक्शन पंपाने वाळू उत्खननासाठी संबंधित अधिकाऱ्यांना जबाबदार धरून कारवाई करणार का? तसेच सुरू असलेले सक्शनपंप तत्काळ बंद करणार का? वाळूचे लिलाव जाहीर करणार का, असे प्रश्न विधानसभेत उपस्थित केले.
महसूलमंत्री बावनकुळे म्हणाले, सरकारचे वाळू धोरण येत्या काही दिवसांत जाहीर होणार आहे. वाळू धोरणाचा मसुदा अंतिम टप्प्यात आहे. सदस्यांच्या काही सूचना असतील, तर त्यांनी जरूर द्या. सक्शनपंपाने वाळू उत्खनन करणे हा गंभीर गुन्हा आहे. त्यामुळे आजच मी कोकण आयुक्तांना आदेश देतोय की तहसीलदारांकडून तत्काळ सक्शनपंप बंद करण्यात यावेत. तहसीलदारांनी ही कारवाई केली नाही, तर संबंधित तहसीलदारावर तातडीने निलंबनाची कारवाई करण्यात येईल.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:03 PM 18/Mar/2025














