रत्नागिरी नगर परिषदेच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे ३ ऑक्टोबर रोजी लोकार्पण

रत्नागिरी : रत्नागिरी नगर परिषदेच्या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे लोकार्पण एक दिवस लांबणीवर पडले आहे. आता या हॉस्पिटलचा शुभारंभ नवरात्रौत्सवाच्या प्रारंभी म्हणजेच ३ ऑक्टोबर रोजी होणार आहे. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक असे या हॉस्पिटलचे नाव निश्चित करण्यात आले आहे. या हॉस्पिटलच्या लोकार्पण सोहळ्याच्या दिवशीच रत्नदुर्ग किल्ला येथील शिवसृष्टीमधील पूर्णाकृती छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याचेही अनावरण होणार आहे. मुख्यमंत्री या कार्यक्रमाला येणार असल्याच्या दिशेने प्रशासनाने तयारी सुरू केली आहे.

रत्नागिरी नगरपरिषदेच्या मिस्त्रीविल्ला येथील मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये शासन योजनांतर्गत सर्व उपचार, तपासण्या, डायलेसीस, शस्त्रक्रिया मोफत होणार आहेत. अपघात विभागासह इतर सर्व अत्यावश्यक सेवा २४ तास खुल्या राहणार आहेत. या सर्व सेवा मुंबईच्या साधना फाऊंडेशनमार्फत दिल्या जाणार आहेत.

पालकमंत्री उदय सामंत यांच्या स्वप्नातील या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल प्रकल्पात सर्व रोगनिदान, आयसीयु, ऑपरेशन थिएटर आहे. याठिकाणी कॅन्सर ऑपरेशन, किमो थेरपी, मेंदूसह हाड, मणका, कंवर, गुडघा, लिगामेंट शस्त्रक्रिया उपलब्ध होणार आहेत. किडणी व ग्लेडर ट्रीटमेंट, किडणी शस्त्रक्रिया, हर्निया, गॉलब्लेडर, अपेंडिक्स, पाईल्स, फिशर यासह इतर अनेक आजारांच्या शस्त्रक्रिया येथे होणार आहेत.

नवजात बालकांसाठी अतिदक्षता विभाग असून डिजिटल एक्स-रे, सोनोग्राफी, सर्व रक्त तपासणी, लघवी, धुंकी अशा सर्व तपासण्यासुद्धा निशुल्क आहेत. या मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटलचे प्रथम २ ऑक्टोबर रोजी लोकार्पण करण्याचे नियोजन करण्यात आले होते; परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचेही अनावरण करायचे असल्याने हे दोन्ही कार्यक्रम नवरात्रौत्सवाच्या पहिल्या माळेच्या दिवशी होणार आहेत.

जिल्हा प्रशासनाकडून जोरदार तयारी
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत हे महत्त्वाचे दोन कार्यक्रम व्हावेत यासाठी पालकमंत्री उदय सामंत प्रयत्नशील आहेत. जिल्हा प्रशासनासह पोलीस प्रशासनाने मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीनुसार आवश्यक असलेली पूर्वतयारी सुरू केली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:05 AM 18/Sep/2024