संगमेश्वर : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील सोनवी नाक्यात वाहतूक कोंडी होत आहे. अवजड वाहने या वाहतूक कोंडीत अडकून पडत आहेत. सद्यस्थितीमध्ये सोनवी पुलाचे काम सुरू असल्याने महामार्गाची वाहतूक सुरळीत होईल, अशाप्रकारे नाक्यामध्ये व्यवस्था करणे आवश्यक होती, मात्र कोणत्याही प्रकारची उपाययोजना न करता वाहतूक सुरू असल्याने सोनवी नाक्यामध्ये वाहने अडकून पडत आहेत. कोल्हापूरकडे जाणारी वाहनांनाही या कोंडीचा फटका बसत आहे.
गेले अनेक दिवस वाहतूक कोंडीमुळे प्रवासी वर्ग मेटाकुटीला आला आहे. वाहतूक कोंडी रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी होत आहे. सोनवी पुलावर वारंवार खड्डे पडलेले असतानाही खड्डे बुजवले जात नसल्याने दुचाकी स्वारासह वाहनांचा अपघात होण्याची भीती वर्तवण्यात येत आहे. अवजड वाहनांमुळे परिसरात धुळीचे साम्राज्य पसरले आहे. रस्त्यावर धुळीमुळे वाहन चालवताना जीव मुठीत धरून चालवावे लागत आहे. एका बाजूला चौपदरी करण्याची कामे सुरू आहेत, पण दुसऱ्या बाजूला वाहने, वाहनचालक आणि प्रवासी वर्गाला गृहीत न धरता रस्त्याचे काम सुरू असल्याने नाराजी व्यक्त होत आहे.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर शिमगोत्सवासाठी रविवारी अवजड वाहनासाठी वाहतूक बंद ठेवण्यात आली होती, मात्र आदेशाचे पालन कोठेही होताना दिसत नसून अवजड वाहने सुरूच असल्याने संगमेश्वरात वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. सोनवी पूल येथे दहा ते पंधरा मिनिटे वाहने अडकून पडत असल्याने चाकरमान्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
उपाययोजनेची मागणी
महामार्गावरील सोनवी पुलाचे काम सुरू असून, महामार्गावरील वाहतूक कोंडीत भर पडत आहे. त्यामुळे अपघाताचेही धोके वाढले आहेत. याचा विचार करून तातडीने संबंधित प्रशासनाने उपाययोजना करून प्रवाशांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:39 PM 18/Mar/2025
