रत्नागिरी : कोकणात विशेषतः जिल्ह्यात शिमगोत्सवाच्या अनेकविध प्रथा आहेत. शेवरीचे झाड, रायवळ आंबा आणि सुरमाड, पोफळीची होळी उभी करण्याची प्रथा पाहायला मिळते. बहुतांश गावात हापूस, पायरी, केशर आंब्याची लागवड होत असल्याने होळीसाठी रायवळ आंब्याचे झाड मिळत नाही. त्यामुळे झाडाची होळी करण्यास पुढील काही वर्षांत अशी झाडे मिळावीत, या हेतूने हातीस ग्रामविकास मंडळाने (मुंबई, हातीस) देवस्थानच्या जागेत रायवळ आंब्याच्या रोपांची लागवड केली आहे. ही रोपे गेल्या चार वर्षांत चांगली वाढली आहेत.
पर्यावरण संस्थेने कोकणातील शिमगोत्सवासंदर्भात काही वर्षांपूर्वी माहिती संकलित केली होती. त्या माहितीच्या आधारे होळीसाठी लागणाऱ्या झाडांची संख्या कमी होणे व नवीन झाड शोधण्यासाठी मेहनत घ्यावी लागते, असे निदर्शनास आले. आंब्याची किंवा अन्य होळी तोडायला संस्थेचा विरोध नाही. त्यासोबत नवीन झाडेसुद्धा लावावीत, असे पर्यावरण संस्थेचे म्हणणे आहे. हातीस गावात अआंब्याची होळी असते. त्यासाठी पर्यावरण संस्थेचे प्रमुख व कोकण कृषी विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. श्रीरंग कद्रेकर यांच्या मार्गदर्शनाखाली रोपे लावण्याचा निर्णय घेतला.
हातीस येथे साधारण चार वर्षापूर्वी रायवळ आंब्याची २५ रोपे लावण्यात आली. ही रोपे जगवण्यासाठी मंडळाला मेहनत घ्यावी लागत असून, मोकाट आंब्याच्या बाठा किंवा अन्य बिया हमखास रुजण्यासाठी करवंदांच्या झाळीत किंवा काटेरी झाडांच्या झाडीत बिया टाकाव्यात म्हणजे जगतात, त्याला मोकाट गुरांचा त्रास होत नाही. शिवाय जे आंबा-काजू बागायतदारांनीही आपल्या हद्दीलगत, कोपऱ्यात, जागा मिळेल तिथे आंब्याची रोपे लावून ठेवावीत, असे आवाहन डॉ. कद्रेकर यांनी केले आहे.
शेवरीची होळी प्रसिद्ध
शेवर या झाडांच्या ४५० होळ्या, तर १४० ते १५० आंब्याच्या आणि सुपारी व इतर १५ ते २० झाडांच्या फांद्यांचा वापर केला जातो. रत्नागिरी तालुक्यात आंब्याची ७० झाडे, सुरमाडाची ४० तर सुपारीची ५ झाडे होळीसाठी दरवर्षी वापरली जातात. फाकपंचमीला पहिली होळी शेवरीच्या झाडाची केली जाते, अशी प्राथमिक माहिती पर्यावरण संस्थेने संकलित केली आहे. गुरांचा त्रासही असतो, पण यावर मात करून ही सर्व झाडे जगवली आहेत. पुढील काही वर्षात ही रोपे नक्कीच मोठी होणार आहेत.
कोकणी माणसाचा शिमगोत्सव सर्वांत आवडता सण. या सणात झाडे, फांद्यांची होळी होत असली तरीही झाडांचे संवर्धन होणे गरजेचे आहे. येत्या जून महिन्यात आपण सर्वांनी मिळून आंब्याच्या बाठा लावून झाडांची संख्या वाढवूया आणि दुसरा होळीचा सण साजरा करूया- डॉ. दिलीप नागवेकर, हातीस
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:56 PM 18/Mar/2025














