रत्नागिरी : जिल्ह्यातील डोंगराळ, खडकाळ आणि अरुंद मार्गावरील आगीवर नियंत्रण मिळवणे आता सोपे झाले आहे. रत्नागिरी आणि चिपळूण नगरपरिषदेला प्रत्येकी एक असे दोन लहान अग्निशमन प्राप्त झाले आहेत. आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून दोन फायर अँड रेस्क्यू अग्निशमन वाहने मिळाली आहेत.
रत्नागिरी जिल्हा हा मोठ्या प्रमाणात डोंगराळ आणि खडकाळ आहे. उन्हाळ्यात गवताला आणि फळबागांना आग लागण्याचे प्रमाण वाढत आहे. अशा डोंगराळ भागात आग लागल्यानंतर उपलब्ध असलेले मोठे अग्निशामक त्याठिकाणी जाऊ शकत नाही. अशावेळी रत्नागिरी आणि चिपळूण नगरपरिषदेला मिळालेले नवीन अग्निशमन उपयोगी पडणार आहेत. हे अग्निशमन डोंगरातून जाणाऱ्या खडकाळ वाटेतूनही पुढे जाऊ शकतील, अशी त्या वाहनांच्या चाकांची रचना आहे.
रत्नागिरी नगरपरिषदेकडे सध्यस्थितीत दोन मोठे अग्निशमन, दोन बुलेट दुचाकीचे अग्निशमन आहेत. त्यामध्ये आता या नवीन फायर अँड रेस्क्यू अग्निशमनची भर पडली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात कुठेही आग लागण्याची दुर्घटना घडल्यावर रत्नागिरी नगरपरिषदेच्या अग्निशमन दलालासुद्धा जावे लागते. अरुंद रस्त्यांच्या ठिकाणी किंवा खडकाळ, डोंगराळ भागात जाताना मोठ्या अग्निशमन बंबावर मर्यादा येत होत्या. ही अडचण आता संपुष्टात आली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:16 AM 19/Mar/2025













