रत्नागिरी : बँकेच्या सभासदांना ३० टक्के लाभांश देणारी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक देशातील पहिली बँक आहे. बँकेच्या ठेवी, कर्जव्यवहार या गोष्टींचे अवलोकन करून बँकेची आर्थिक स्थिती उत्तम असल्याचे त्याचप्रमाणे राज्यातील पहिल्या पाच बँकांमध्ये जिल्हा बँकेचा समावेश असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
रत्नागिरी दौऱ्यावर आलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँकेला सदिच्छा भेट दिली. बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांनी श्री. पवार यांचा शाल, पुष्पगुच्छ व सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला. यावेळी पालकमंत्री उदय सामंत, खा. सुनील तटकरे, आ. शेखर निकम, जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह उपस्थित होते. प्रास्ताविक बँकेचे उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी केली.
यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोगत व्यक्त करताना बँकेचे अध्यक्ष डॉ. तानाजीराव चोरगे यांच्याबदद्दल गौरवोद्गार काढले. आपण पुणे जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी ७ वर्षे कामकाज केल्याचे सांगून, राज्य सहकारी बँकेमध्ये स्व. गोविंदराव निकम यांच्यासमवेतही कामकाज केल्याचे सांगितले. बैंक राज्यामध्ये अग्रेसर होण्यासाठी डॉ. चोरगे यांच्यासारखे अभ्यासू, चांगला उद्देश ठेऊन, आपल्या तत्त्वाशी बँक हिताकरिता कोणतीही तडजोड न करता आणि बँकेला पूर्ण वेळ देणारे नेतृत्व मिळाल्यामुळे तसेच बँकेच्या सर्व संचालकांना विश्वासात घेऊन चांगले निर्णय घेतल्यामुळे राज्यातील ५ अग्रगण्य जिल्हा बँकांमध्ये रत्नागिरी जिल्हा बँकेचा समावेश झाला आहे. त्यामुळेच राज्य सरकारने शासकीय निधी ठेवण्याकरिता मान्यता दिलेल्या १४ बँकांमध्ये रत्नागिरी जिल्हा बँकेचा समावेश करण्यात आला आहे. शासनाच्या ठेवी बँकेकडे वळवण्यासाठी पालकमंत्री डॉ. उदय सामंत व बँकेचे संचालक आ. शेखर निकम यांनी संबंधितांना सूचना द्याव्यात. तसेच जिल्हाधिकारी यांनीही यात लक्ष घालावे, असे सांगितले.
यावेळी बँकेचे सर्व संचालक मंडळ तसेच अधिकारी कर्मचारी व सहकारातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपाध्यक्ष बाबाजीराव जाधव यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.
बँकेची पाच हजार कोटींकडे वाटचाल
रत्नागिरी जिल्हा बँकेला डॉ. चोरगे यांच्यासारखे खंबीर नेतृत्व व सर्व संचालक मंडळाची मिळालेली साथ यामुळे पीक कर्जाना वाव नसताना तसेच ठेवी संकलनाकरिता मर्यादा असतानाही डॉ. चोरगे यांनी बँकेचा अध्यक्ष म्हणून पद्भार स्वीकारताना रु. ८०० कोटी व्यवसाय असलेली बँक आज ५ हजार कोटी रुपयांकडे वाटचाल करीत असल्याबाबत कौतुक करून शुभेच्छा दिल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:22 AM 19/Mar/2025














