कोकण रेल्वे मार्गावरील प्रकरणे न्यायालयात

रत्नागिरी : कोकण रेल्वेमार्गावरील रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाण्यात दाखल होणारी प्रकरणे रत्नागिरी न्यायालयात चालवण्यात येणार आहेत. २० फेब्रुवारी २०२५ पासूनचे रिमांड काम व नव्याने दाखल होणारे दोषारोपपत्र सर्वप्रथम मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्याकडे दाखल होतील आणि रत्नागिरी न्यायदंडाधिकारी वर्ग-१ यांच्या न्यायालयात निकाली निघणार आहेत. निकाली प्रकरणाचे अपिल कार्यक्षेत्र सत्र न्यायालय रत्नागिरी असेल, अशी माहिती जिल्हा न्यायालयाकडून दिली आहे.

कोकण रेल्वेमार्गावर रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाणे नव्याने सुरू केले आहे. रत्नागिरी लोहमार्ग पोलिस ठाण्याच्या अधिकार क्षेत्रामध्ये कोलड, इंदापूर, माणगांव, गोरेगावरोड वीर, सापेबामणे, करंजाडी, विन्हरे, दिवाणखवटी, खेड (पोलिस दूरक्षेत्र), अंजणी, कळबंणी, चिपळूण, कामथे, सावर्डे, आरवली ग्रेड, संगमेश्वर रोड, कडवई, उक्षी, भोके, रत्नागिरी, निवसर, आडवली, वेरवली, विलवडे, सौंदळ, राजापूर रोड आदींचा समावेश आहे. या अधिकारक्षेत्राच्या २७ पोलिस कार्यक्षेत्रांमध्ये भारतात व महाराष्ट्रात अस्तित्वात असलेल्या रेल्वे अॅक्ट १९८९ व रेल्वे प्रोटेक्शन अॅक्ट १९६६ कायद्याप्रमाणे न्यायालयापुढे कामकाज चालणार आहे, असे जिल्हा न्यायालय रत्नागिरी यांच्याकडून सांगण्यात आले आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:28 AM 19/Mar/2025