रत्नागिरी : आस्था सोशल फाऊंडेशनच्या संस्थापिका सुरेखा पाथरे यांना स्वरूप योगिनी पुरस्कार प्रदान

रत्नागिरी : स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळ (पावस, रत्नागिरी) यांच्या वतीने दिला जाणारा स्वरूप योगिनी पुरस्कार आस्था सोशल फाऊंडेशनच्या संस्थापिका सुरेखा देवराम पाथरे यांना शीतल काळे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला.

प्रतिभा प्रभुदेसाई यांनी सुरेखा पाथरे यांचा परिचय करुन दिला व मानपत्राचे वाचन केले. सत्काराला उत्तर देताना पाथरे यांनी सांगितले की, आस्था फाऊंडेशनच्या माध्यमातून स्पेशल एज्युकेशन सुरू झाले. दिव्यांग हेल्पलाइन सुरू झाली. आयुष्यात छोटे-मोठे पुरस्कार मिळाले . या पुरस्काराच्या रूपाने आज स्वामींचा आशीर्वाद मिळाला आहे. हे काम असे पुढे जाईल. त्यांनी स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाबद्दल ऋण व्यक्त करते. कार्यक्रमाची सुरुवात विजय रानडे यांच्या नमस्तेस्तु महामाये या देवीस्तुती गायनाने झाली. रानडे यांचा सत्कार स्वामी स्वरूपानंद सेवा मंडळाचे कार्यवाह हृषिकेश पटवर्धन यांनी केला. श्रीनिवास पेंडसे यांनी अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्माचे त्रिशतकी वर्षानिमित्त पुण्यश्लोक महाराणी या विषयावर व्याख्यानाचे द्वितीय पुष्प गुंफले. पेंडसे म्हणाले की, मल्हाररावांचे मूळ गाव वाधगाव होते. पुण्याजवळील होळ गावात राहायला गेले म्हणून होळकर असे आडनाव पडले. मल्हारराव होळकरांनी छत्रपतींच्या राज्यविस्ताराला सुरुवात केली. सैन्याचा तळ चौंडीला होता. तेथे सीना नदीच्या काठावर शंकराच्या मंदिरात दर्शनासाठी मुलगी आली होती, त्यांचे धाडस पाहून बाजीरावांनी अहिल्यादेवींचा विवाह खंडेरावांशी लावून दिला. अहिल्यादेवींनी राज्यकारभार केला. सामान्यांच्या घरामध्ये अहिल्याबाईंनी स्थान निर्माण केले. अहिल्यादेवींनी अनेक ठिकाणी कार्य केले आहे. त्यांनी अनेक देवस्थानांना भेटी दिल्या आहेत. रत्नागिरी जिल्ह्यातील कळबंस्ते गावात रामेश्वर मंदिराची स्थापना त्यांनी केली. अनेक ठिकाणी धर्मशाळा बांधल्या. अहिल्याबाईंनी महत्वाचे २२ निर्णय घेतले. दत्तक घेण्याऱ्याला जो आवडेल त्यालाच दत्तक घेता येईल, असे त्यांनी सांगितले. अहिल्याबाईंचे कार्य मोलाचे आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रसाद वैद्य यांनी केले तर मंडळाचे कार्यवाह हृषिकेश पटवर्धन यांनी आभार मानले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:22 PM 05/Oct/2024