खेड-दाभिळनजीक रस्त्यावर उभ्या कारला दुसऱ्या कारची पाठीमागून धडक

खेड : मुंबई-गोवा महामार्गावरील दाभिळनजीक मंगळवारी दुपारी १२.३०च्या सुमारास रस्त्यालगत उभ्या असलेल्या आय-द्वेन्टी कारला पाठीमागून येणाऱ्या दुसऱ्या कारने धडक दिली. अपघातात ७ वर्षीय चिमुरडीसह पाचजण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी घरडा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

कारचालक राजेंद्र भिकू मिरगळ (६०, रा. पुणे) यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. अभिषेक घाडगे (३२), तेजश्री अभिषेक घाडगे (३०), दीपाली सावर्डेकर (२४), आराध्य भोईर (१५), श्री भोईर (७) अशी जखमींची नावे आहेत. चालक अभिषेक घाडगे हे आय-२० कारने (एम.एच. १४ डी. एन. ४३७९) चिपळूण येथून मुंबईला जात होते. दाभिळनजीक आले असतां विश्रांतीसाठी कार रस्त्यालगत उभी केली होती. या दरम्यान, चालक राजेंद्र मिरगळ हा किया कारने (एम. एच. ४६ बी. व्ही. ६२६५) मार्लेश्वर येथून पनवेलच्या दिशेने जात होता. रस्त्यालगत उभ्या असलेल्या कारचा अंदाज न आल्याने पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेनंतर उभी कार उलटून आतील पाचजण जखमी झाले. रणरणत्या उन्हात घडलेल्या अपघाताने सुरूवातीला काही काळ वाहतूक ठप्प झाली.

अपघाताची माहिती मिळताच चिपळूण महामार्ग वाहतूक पोलीस उपनिरीक्षक अनंत पवार, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक गिम्हवणेकर, शिंदे, पोलीस हवालदार देवरूखकर यांच्यासह लोटे पोलीस दूरक्षेत्राचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संजय पाटील व सहकारी यांनी तातडीने घटनास्थळी पोहचून जखमींना मदतकार्य केले. अपघातात कारचे नुकसान झाले.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
03:13 PM 19/Mar/2025