रत्नागिरी : वरिष्ठ व निवडश्रेणीसाठी प्रशिक्षण न झाल्याने अनेक शिक्षक लाभापासून वंचित

माखजन : रत्नागिरी जिल्ह्यातील ज्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची सेवेची बारा व चौवीस वर्षे पूर्ण होऊन देखील वरिष्ठ व निवड श्रेणीचे शालेय शिक्षण विभाग व डाएटकडून प्रशिक्षण न झाल्याने अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी लाभापासून वंचित राहिले आहेत.

खरे तर डाएट रत्नागिरी यांचे मार्फत शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे वरिष्ठ व निवड श्रेणीसाठी प्रशिक्षण लावणे गरजेचे होते. परंतु त्या संदर्भातील अद्याप कोणतीच कारवाई न झाल्याने बारा व चोवीस वर्षे पूर्ण केलेल्या लाभार्थ्यांना प्रतिक्षाच करावी लागली आहे.

पूर्वी प्रशिक्षण जाहीर झाल्यावर प्रशिक्षण घेतले जाईल या हमीपत्रावर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नियमित वेतनात लाभ मिळत असे. परंतु अशा हमीपत्रावर सध्या लाभ दिला जात नसल्याने, लाभार्थी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण कार्यक्रमाची वाट पाहण्याशिवाय काहीही पर्याय नसल्याचे चित्र आहे.

डाएट व शिक्षण विभाग रत्नागिरी यांनी तत्काळ वरिष्ठ व निवड श्रेणी साठी प्रशिक्षण द्यावे, अशी जोरदार मागणी शिक्षक वर्गातून करण्यात येत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:45 AM 20/Mar/2025