पुणे : राज्यात गतवर्षी झालेल्या मुसळधार पावसामुळे सर्वच भागांमध्ये असलेल्या धरणांमध्ये समाधानकारक जलसाठा होता, मात्र, जानेवारी महिन्याच्या मध्यापासून उन्हाळ्याच्या झळा वाढू लागल्या, त्यामुळे धरांमधील असलेल्या जलसाठ्यात हळूहळू घट होऊ लागली. सध्या मार्च महिना सुरू असून, उन्हाचा तडाखा वाढला आहे. त्यामुळे केवळ ५१.६५ टक्के जलसाठा शिल्लक राहिला असून, मागील वर्षाच्या तुलनेत सुमारे ९.६ टक्क्यांनी जास्त आहे. मात्र, उन्हाचा तडाखा लक्षात घेता हा जलसाठा लक्षणीयरीत्या कमी होत जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे पाण्याचा वापर जपून करावा लागणार आहे.
जलसंपदा विभागांतर्गत नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, कोकण असे सहा विभाग आहेत. त्याअंतर्गत २ हजार ९९७ धरणे असून, त्यामध्ये मोठे प्रकल्प १३८, मध्यम प्रकल्प २६० आणि लघु प्रकल्प २ हजार ६९९ एवढे आहेत. राज्यात मागील वर्षी विदर्भ, मराठवाड्यासह सर्वच भागांत मुबलक पावसाने हजेरी लावली. अगदी जुलै महिन्यापासून सुरू झालेला पाऊस ऑक्टोबर महिन्याच्या शेवटपर्यंत कोसळत होता. त्यामुळे जोरदार येवा (धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पडलेल्या पावसाचे पाणी) येत राहिला. पाण्याचा येवा योग्य पद्धतीने साठवल्यामुळे जलसाठा टिकवून ठेवण्यात जलसंपदाला यश आले. आता मात्र उन्हाळ्याचा तडाखा वाढला. त्यामुळे बाष्पीभवन, तसेच पाण्याची मागणी वाढल्यामुळे धरणांमधील जलसाठा कमी होऊ लागला आहे. मागील महिन्यात (फेब्रुवारी) सर्वच धरणांमध्ये ६० टक्क्यांहून अधिक जलसाठा होता. आता मात्र त्यामध्ये सुमारे १० टक्क्यांनी हा जलसाठा कमी झाला आहे, राज्यात मोठ्या, मध्यम आणि लहान धरणांची एकूण पाणी साठवण क्षमता १ हजार ४३०.६३ टीएमसी एवढी आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:04 AM 20/Mar/2025














