उमरे प्रादेशिक नळपाणी योजनेला घरघर..

संगमेश्वर : तालुक्यातील उमरे प्रादेशिक नळपाणी योजनेला अखेरची घरघर लागली आहे. येथील दहा गावे पाणी पाणी करत आहेत. उमरे धरणाला गेली तीन वर्षे गळती लागल्याने या योजनेवरील दहा गावे पाणीटंचाईचा सामना करत आहेत.

चालू वर्षी या धरणाला भलेमोठे भगदाड पडल्याने या धरणातील पाणीसाठा कमी करण्यात आला होता. त्यामुळे फेब्रुवारीपासून येथील दहा गावांना एक ते दोन दिवसाआड पाणी सोडण्यात येत आहे. मागील आठवड्यात या चरणाला गटविकास अधिकारी भरत चौगुले यांनी भेट दिली होती. त्यावेळी सोमवारी वीज असूनही येथील कामगार पाणी सोडत नाहीत.

तसेच जरी वीज गेली तरी ती साडेनऊ-दहा वाजता जाते आणि आपले पंपिंग पहाटे चारला केले जाते. याचाच अर्थ जरी विद्युत्पुरवठा खंडित झाला तरी एक ते दोन वाडांना पाणी मिळू शकते. त्याप्रमाणे सोमवारी पाणी सोडण्यास सांगावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली होती. त्यावेळी गटविकास अधिकारी यांनी येथील मेस्त्री, चिकणे यांना सूचना केल्या, त्यांनीही पाणी सोडण्याचे कबूल केले; मात्र या सोमवारी वीज असतानाही या पाणी सोडलेले नाही, तसेच येथील कुंभारवाडी, कपिलनगर, अंत्रवली बौद्धवाडी आदी उंच भागात गुरुवारपासून पाणी आलेले नाही, अशी माहिती येथील ग्रामस्थ आणि या योजनेवर काम करणारे कामगार सांगत आहेत. आज येथील वाड्यांतील महिलांना दोन किमी अंतरावरून डोक्यावरून पाणी आणावे लागत आहे.

सध्या शिमगोत्सव सुरू असल्याने प्रत्येक घरात चाकरमानी आले आहेत. त्यात पाणीटंचाईसारखे भीषण संकट येथील ग्रामस्थांवर ओढवले आहे आणि प्रशासन बघ्याची भूमिका घेत आहे. जे काय थोडफार पाणी मिळण्याची शक्यता आहे, तेही येथील स्वतःला मेस्त्री म्हणवणारा कामगार देत नसल्याने ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे. धरणातील पाणीसाठा पूर्ण आटल्याने अजून चार ते आठ दिवसच पाणी मिळेल, अशी परिस्थिती असताना आणि काही ठिकाणी उंच भागात्त आताच पाणी चढत नसल्याने प्रशासनाने एकाही टँकरची व्यवस्था केलेली नाही.

आठवडाभरच पाणी मिळेल…
उमरे धरणातील पाणीसाठा पूर्णपणे आटला आहे. त्यात कडाक्याचे उन्हामुळे जेमतेम आठवडाभरच पाणी उपलब्ध होईल, असे ग्रामस्थांचा अंदाज आहे. त्यामुळे वेळीच प्रशासनाने टँकरची सुविधा उपलब्ध करावी, अशी मागणी त्यांच्याकडून होत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:42 AM 20/Mar/2025