Donald Trump on India: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प टॅरिफ वॉर छेडले आहे. त्यांनी अमेरिकन सामानांवर ज्यादा शुल्क(टॅरिफ) लादणाऱ्या प्रत्येक देशावर तेवढेच किंवा त्याहून अधिक शुल्क लादण्याचा इशारा दिला आहे.
यासाठी त्यांनी 2 एप्रिल ही तारीखही निश्चित केली आहे. विशेष म्हणजे, त्यांनी या शुल्काच्या मुद्द्यावरुन भारतावर अनेकदा निशाणा साधला आहे. आता पुन्हा एकदा त्यांनी शुल्काच्या मुद्द्यावरुन भारताला सुनावले.
यापूर्वी ट्रम्प यांनी भारताचे ‘टॅरिफ किंग’ असे वर्णन केले होते आणि भारत खूप अन्यायकारकपणे शुल्क आकारतो, असेही म्हटले होते. आता ब्रेटबार्ट न्यूजला दिलेल्या मुलाखतीत ट्रम्प म्हणतात की, माझे भारताशी चांगले संबंध आहेत. पण, भारताची एक समस्या आहे, ते जगातील सर्वाधिक शुल्क लादणाऱ्या देशांपैकी एक आहेत. मला विश्वास आहे की, भारत हळूहळू शुल्क कमी करेल. मात्र, आम्ही 2 एप्रिलपासून परस्पर शुल्क लागू करण्यावर ठाम आहोत.
2 एप्रिलपासून परस्पर शुल्क लागू
डोनाल्ड ट्रम्प यांनी याआधीच सांगितले होते की, 2 एप्रिलपासून अमेरिका त्यांच्या मालावर ज्यादा शुल्क लादणाऱ्या देशांवरही समान शुल्क लागू करेल, ना कमी ना जास्त. यूएस काँग्रेसला संबोधित करताना ते म्हणाले की, आमची योजना 1 एप्रिलपासून परस्पर शुल्क लागू करण्याची होती, परंतु ‘एप्रिल फूल डे’शी जोडले जाऊ नये, म्हणून 2 एप्रिल तारीख ठरवली. इतर देशांनी अनेक दशकांपासून आमच्यावर ज्यादा शुल्क लादले, आता आमची पाळी आहे, असेही ट्रम्प म्हणाले.
परस्पर शुल्क काय आहे?
परस्पर शुल्क हे असे कर आहेत, जे एका देशाद्वारे दुसऱ्या देशातून आयात केलेल्या वस्तूंवर लादले जातात. म्हणजेच एखादा देश अमेरिकन वस्तूंवर जे काही शुल्क लावतो, अमेरिका त्या देशाच्या वस्तूंवरही तेच शुल्क लावेल. अध्यक्षीय निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ट्रम्प यांनी परस्पर शुल्काबाबत अनेकदा भाष्य केले होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
15:37 20-03-2025
