रत्नागिरी : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या शीळ धरणात गेल्या वर्षीपेक्षा यावर्षी दुप्पट साठा आहे; परंतु वाढता उष्मा आणि भविष्यात १५ जूनपर्यंत शहरवासीयांना टंचाईला तोंड द्यावे लागू नये, यासाठी पाणी वाटपाचे नियोजन केले आहे. एप्रिलपासून पाणी कपातीला सुरुवात केली जाईल. ३० मार्चला गुढीपाडवा आणि ३१ ला ईद असल्याने एप्रिलपासून दर सोमवारी कपातीला सुरुवात केली जाणार आहे. पालिका प्रशासनाने याला दुजोरा दिला.
शीळ धरणात पावसाळा सुरू होईपर्यंत पाणीसाठा पुरणारा असला तरी उन्हाळ्याचा तडाखा वाढल्याने शिमगा संपल्यानंतर म्हणजेच रंगपंचमीनंतर प्रत्येक सोमवारचा पाणीपुरवठा बंद ठेवण्याबाबत विचार सुरू झाला आहे. शीळ धरणाची पाणी साठवण क्षमता ३.६६६ दशलक्ष घनमीटर इतकी आहे.
अलनिनोच्या प्रभावामुळे पावसाळासुद्धा लांबणीवर पडण्याची हवामान खात्याने भीती व्यक्त केली होती. त्या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात १.६५ दशलक्ष घनमीटर साठा असताना आठवड्यातून दोन दिवस पाणीपुरवठा बंद ठेवला होता. त्यानंतर एप्रिलपासून पावसाळा सुरू होईपर्यंत प्रत्येक सोमवारी शहराचा पाणीपुरवठा बंद ठेवला होता. हा पाणीपुरवठा समाधानकारक पाऊस झाल्यानंतर ४ जुलैपासून नियमित करण्यात आला होता.
शीळ धरणातील साठ्याच्या पाहणीनुसार २.०५१ दशलक्ष घनमीटर पाणी असल्याचे पातळीची मोजमाप करणाऱ्या पाटबंधारे विभागामार्फत सांगण्यात येत आहे. रत्नागिरी शहरात सुमारे ११ हजार नळजोडण्या आहेत. धरणातील सध्याचा पाणीसाठा पावसाळा नियमित होईपर्यंत पुरणारा आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:43 AM 21/Mar/2025














