चिपळूण पालिकेने १२ मालमत्तांना केल्या सील

चिपळूण : नगरपालिकेने बुधवारी (ता. १९) आणखी १२ मालमत्तांना सील ठोकले आहे. या धडक कारवाईमुळे आतापर्यंत ६० टक्के म्हणजेच सुमारे ११ कोटी रुपयांची वसुली करण्यात यश आले आहे.

नगरपालिकेला मालमत्ता व पाणीपट्टीचे थकीत व चालू वर्षाचे मिळून १८ कोटी ३३ लाख ८१ हजार ५३७रुपयांची वसुली अपेक्षित आहे. त्यापैकी आतापर्यंत सुमारे ११ कोटी रुपये वसूल झाले असून, ६० टक्के वसुली झाली; मात्र वसुलीचा टक्का वाढविण्यासाठी मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली उपमुख्याधिकारी तथा कर वसुली अधिकारी सतीश दंडवते, प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, कार्यालय अधीक्षक रोहित खाडे, सहायक कर अधिकारी सुशांत मोहिते, मालमत्ता विभागप्रमुख सागर शेडगे यांनी अन्य अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून नळ कनेक्शन तोडण्यासह मालमत्ता जप्तीच्या कारवाईला सुरुवात केली आहे.

मंगळवारी पहिल्याच दिवशी तीन लाखांचा कर थकित असलेल्या संचयनीच्या बंद इमारतीसह आठ मालमत्ता सील करण्यात आल्या. बुधवारी दुसऱ्या दिवशी १२ गाळे व सदनिकांना सील ठोकण्यात आले आहे. १० हून अधिक नळ जोडण्या कापण्यात आल्या आहेत. बुधवारी एका दिवसात सुमारे आठ लाख, तर आतापर्यंत सुमारे ११ कोटी रुपयांची वसुली झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:48 AM 21/Mar/2025