खेड : देवसडेवासीयांची पाण्यासाठी वणवण

खेड : तालुक्यातील सुसेरी-देवसडे येथील जलस्रोत आटल्याने ग्रामस्थ पाण्यासाठी वणवण करत आहेत. रणरणत्या उन्हामुळे पाणीसाठ्यात कमालीची घट झाली आहे. येथील सात वाड्यांना ऐन शिमगोत्सवात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. टँकरच्या पाण्यासाठी ग्रामस्थ पंचायत समितीत अर्ज देणार आहेत.

सुसेरी-देवसडे येथे कदमवाडी, जाधववाडी, वैरागवाडी, बौद्धवाडी, सावंतवाडी, मधलीवाडी आदी वाड्या आहेत. येथे जवळपास ४१३च्या आसपास लोकवस्ती आहे. नद्यानाल्यांसह विहिरी कोरड्या पडल्याने ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती सुरू आहे. पायपीट करून मिळणाऱ्या जेमतेम पाण्यावर तहान भागवावी लागत आहे. पाणीटंचाई आराखड्यानुसार येथील ग्रामस्थांना एप्रिल महिन्यात पाणीटंचाईची झळ पोहचेल, अशी नोंद करण्यात आली आहे; मात्र टंचाईची चाहुल लागल्याने ग्रामस्थ हवालदिल झाले आहेत. यामुळे ग्रामस्थांकडून टँकरच्या पाण्यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केल्याचे सांगण्यात आले. देवसडे पाठोपाठ तालुक्यातील धनगरवाड्यांमध्येही पाण्याचे दुर्भिक्ष्य निर्माण झाले असून, डुऱ्यातील जेमतेम पाण्यावर ग्रामस्थांना तहान शमवावी लागत आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:32 PM 21/Mar/2025