खेड- भरणे मार्गावरील वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटणार

खेड : गृहराज्य मंत्री ना. योगेश कदम यांच्या प्रयत्नाने खेड भरणे मार्गावरील अण्णाचा पऱ्या ते खेड ते डेंटल महाविद्यालय पर्यंतच्या रस्त्यांचे डांबरीकरण, मजबूतीकरण केले जाणार आहे. यामुळे या मार्गावरच्या वाहतूक कोंडीचा प्रश्न लवकरच सुटणार आहे. सध्या रस्त्याच्या कामांसाठी रस्त्याची मोजणी करण्यास सुरूवात झाल्याने खेडवासियांनी समाधान व्यक्त केले आहे.

अरुंद रस्ते आणि वाहनांची वाढलेली संख्या यामुळे अण्णाचा पन्ऱ्या ते डेंटल महाविद्यालयापर्यंत सर्रास वाहतूक कोंडी होत असते. याचदरम्यान वाहनधारकांना मोठी कसरत करावी लागते. कधीकधी वाहधारकांमध्ये सातत्याने हमरातुमरीचे प्रसंगही घडत असतात. शिवाय पादचाऱ्यांना चालणेही अवघड होते.

विरूध्द दिशेने येणाऱ्या वाहनांमुळे आणि ओव्हरटेक करण्याच्या प्रकारामुळे अपघातांचे प्रमाण देखिल वाढले आहे. त्यातच धूमस्टाईल दुचाकी चालविण्याच्या प्रकाराची भर पडली आहे. त्यामुळे या मार्गाचे रुंदीकरण व्हावे, अशी मागणी सातत्याने स्थानिकांकडून केली जात होती. दरम्यान, राज्याचे गृहराज्यमंत्री ना. योगेश कदम यांनी या गंभीर प्रश्नाची दखल घेत अण्णाचा पन्ऱ्या ते डेंटल महाविद्यालयापर्यंतच्या रस्त्याच्या रूंदीकरणाचा प्रश्न मार्गी लावला आहे. लवकरच या रस्त्याचे रुंदीकरणासह डांबरीकरण व मजबूतीकरणाचे काम हाती घेतले जाणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
04:03 PM 21/Mar/2025