रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा परिषदेत यंदा तिसर्यांदा पदाधिकार्यांविना सन 2025-26 चा अर्थसंकल्प सादर करण्यात आला आहे. जिल्हा परिषदेच्या सन 2024-25 अंतिम सुधारित 51 कोटी 16 लाख 27 हजार दोनशे चाळीत आणि सन 2025-26 मूळ अंदाजपत्रक 32 कोटी 59 लाख 15 हजार चारशे सत्तावीस रुपयांचे सादर करण्यात आले. या दोन्ही अंदाजपत्रकाला प्रशासनाकडून मंजुरी दिली आहे.
जिल्हा परिषदेच्या सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी वैदेही रानडे यांनी हे अंदाजपत्रक सादर केले. यावेळी अतिरिक्त मुख्यकार्यकारी अधिकारी परिक्षीत यादव, मुख्य व लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत विभाग उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह सर्व खातेप्रमुख, अधिकारी तसेच वित्त विभागांतर्गत अर्थसंकल्प शाखांतील अधिकारी उपस्थित होते. रत्नागिरी जिल्हा परिषदेत सध्या प्रशासकीय कारभार सुरु आहे. जिल्हा परिषदेतर्फे दरवर्षी आपले स्वत:चे आर्थिक अर्थसंकल्प सादर केले जाते. सन 2024-25 या आर्थिक वर्षासाठीचा जिल्हा परिषद स्वत:च्या उत्पन्नाचा अर्थसंकल्प सादर होण्याची प्रतीक्षा सर्वांना लागली होती. पदाधिकार्यांविना यंदाही हा अर्थसंकल्प सादर झाला आहे. महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 चे कलम 137 नुसार पुढील वर्षाचे मुळ अंदाजपत्रक हे 27 मार्चपर्यंत करणेची तरतूद आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग 1-अ मध्ये उपविभाग असाधारण क्रमांक 26 ग्रामविकास विभाग दिनांक 11 मार्च 2022 च्या आदेशान्वये जिल्हा परिषदांच्या सर्व अधिकारांचा वापर करण्यासाठी व त्यांची कर्तव्ये पार पाडण्यासाठीचे अधिकार, प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांना प्रदान करणेत आलेले आहेत. त्यामुळे सर्व उपस्थित खातेप्रमुख यांनी केलेल्या शिफारशींचा विचार करुन, जिल्हा परिषदेच्या स्व उत्पन्नाचे सन 2024-25 चे अंतिम सुधारित अंदाजपत्रक व 2025-26 चे मूळ अंदाजपत्रक सादर करण्यात आले.
जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेपुढे ग्रामीण भागातील जनतेला न्याय देण्याच्या दृष्टिकोनातून हा अर्थसंकल्प सादर आला आहे. सन 2023-2024 या वित्तीय वर्षातील प्रत्यक्ष जमा व प्रत्यक्ष खर्चाचा विचार करता प्रत्यक्षात 1 एप्रिल 2024 रोजी आरंभीचे शिल्लक रक्कम रुपये 17,40,51,000 एवढी राहिली आहे. सन 2024-25 ची अंतिम सुधारित महसुली जमा रक्कम रुपये 20,38,15,246 एवढी विचारांत घेवून रक्कम रुपये 37,78,66,246 महसूली खर्चासाठी उपलब्ध होणार आहे. तसेच सन 2025-26 चे मूळ अंदाजपत्रकात आरंभीची शिल्लक रुपये 91,827/- एवढी आहे. सन 2025-26 ची अंदाजित महसूली जमा रक्कम रुपये 19,62,62,600 एवढी विचारात घेऊन, आरंभीचे शिल्लकेसह रक्कम रुपये 19,63,54,427 महसूली खर्चासाठी तरतूद उपलब्ध केली आहे.
सन 2024-25 च्या मूळ अंदाजपत्रकापेक्षा, सन 2024-25 चे अंतिम सुधारित अंदाजपत्रक हे जास्त रक्कमेचे आहे. महाराष्ट्र शासनाच्या धोरणाप्रमाणे अंदाजपत्रक तयार करताना काही विभागाच्या योजनांसाठी वैधानिक तरतुदी मागील 100 टक्के अनुशेषासह व प्राप्त रकमेच्या, विहित टक्केवारीच्या, विभागनिहाय तरतुदी प्रस्तावित करण्यात आलेल्या आहेत. या तरतुदी करताना रत्नागिरी जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होण्याचा संकल्प करण्यात आला आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:13 22-03-2025














