रत्नागिरी : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) कडून ७ मार्च रोजी लखपत (गुजरात) ते कन्याकुमारी येथे सुरू झालेला देशातील पहिला ‘ग्रेट इंडियन कोस्टल सायक्लोथॉन’ २२ मार्च रोजी रत्नागिरी येथे येणार आहे.
‘सुरक्षित तट, समृद्ध भारत’ या थीम अंतर्गत, या रॅलीचे उद्दिष्ट किनारी भागात राष्ट्रीय सुरक्षेबद्दल जागरुकता निर्माण करणे, ड्रग्ज, शस्त्रे आणि स्फोटकांसह तस्करीमुळे निर्माण होणाऱ्या धोक्यांवर प्रकाश टाकणे हा आहे.
सीआयएसएफचे कंमाडेंट राहुल कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सीआयएसएफच्या ५६व्या स्थापना दिनानिमित्त ही रॅली आयोजित करण्यात आली आहे. ही मोहीम ७ मार्च रोजी पूर्व किनाऱ्यावरील पश्चिम बंगालमधील बक्खली येथून सुरू झाली आहे. पश्चिम मार्ग ३,७७५ किलोमीटर तर पूर्व मार्ग २,७७८ किलोमीटरचा असेल. ३१ मार्च रोजी कन्याकुमारी येथील स्वामी विवेकानंद स्मारकात समारोप करण्यापूर्वी सायकलस्वार मुंबई, कोकण, गोवा, हल्दिया, कोणार्क, विशाखापट्टणम, चेत्रई आणि पाँडिचेरी यासारख्या प्रमुख किनारी शहरांमधून प्रवास करणार आहेत. एकूण १०० समर्पित सीआयएसएफ
सायकलस्वार असून, त्यात ४ महिलांचा समावेश आहे. २५ दिवसांत ११ राज्यांचा ६,५५३ किमीचा कठीण प्रवास करणार आहेत. रत्नागिरीत या रॅलीचे २२ मार्चला आगमन होणार आहे. सर्वंकष विद्यालय, भाट्ये रत्नागिरी येथे सकाळी ११ वाजता कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यावेळी देशभक्तीपर विविध लहान मुलांचे कार्यक्रम होतील.
या कार्यक्रमाला ग्रामस्थांनी उपस्थित राहावे, असे आवाहन केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलातर्फे करण्यात आले आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 22-03-2025














