गणपतीपुळे येथे आज अल्ट्रा मॅरेथॉन

रत्नागिरी : कोकणात स्पोर्ट्स टुरिझममध्ये भरीव काम करणाऱ्या सुवर्णसूर्य फाउंडेशनतर्फे अल्ट्रा मॅरेथॉनचे आयोजन शनिवारी, दि. २२ मार्च रोजी रात्री १२ वाजता गणपतीपुळे मार्गावर करण्यात आले आहे.

कोकणात सर्वप्रथम होणाऱ्या अल्ट्रा मॅरेथॉनसाठी गणपतीपुळे, मालगुंड, भंडारपुळे, नेवरे, कोतवडे, आरे-वारे, बसणी येथील ग्रामस्थ जोरदार तयारीला लागले आहेत. गणपतीपुळे येथे मॅरेथॉनच्या उद्घाटनासाठी पालकमंत्री उदय सामंत, जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित राहणार आहेत.

रत्नागिरी जिल्हा ॲथलेटिक्स असोसिएशनच्या माध्यमातून होत असलेली ही स्पर्धा आहे. प्रत्येक गावातील ग्रामपंचायत, गावातील प्रतिष्ठित व्यक्ती तसेच त्या त्या गावातील देवस्थान समित्या असे सर्वजण आपापला सिंहाचा वाटा या अल्ट्रा मॅरेथॉनच्या यशस्वीतेसाठी देत आहेत. वाडीवस्त्यांमध्ये बैठका घेतल्या जात आहेत. कोकणच्या इतिहासातील हे एक सोनेरी पान असेल, अशी भावना गणपतीपुळे ग्रामपंचायतीमध्ये झालेल्या बैठकीत ग्रामस्थांतर्फे मांडली गेली.

४२ किमीपेक्षा जास्त अंतर धावणे म्हणजे अल्ट्रा मॅरेथॉन होय. धावपटूंचा कस लागणारे हे अंतर जवळपास ५६ किमीचे आहे आणि भारतभरातून सुमारे २४० धावपटू यासाठी गणपतीपुळ्यात येत आहेत. हे खरे क्रीडा पर्यटक आहेत आणि यांच्यासारख्या चोखंदळ पर्यटकांमुळे आर्थिक वृद्धी जास्त प्रमाणात होऊ शकते, अशी भावना गणपतीपुळे, भंडारपुळे नेवरे, आरे-वारे तसेच बसणी येथील ग्रामस्थांनी व्यक्त केली.

श्री देव गणपतीपुळे मंदिर देवस्थानच्या प्रांगणातून शनिवारी रात्री १२ वाजता अल्ट्रा मॅरेथॉन सुरू होणार आहे. गणपतीपुळे, भंडारपुळे ग्रामस्थ पहिल्या ३-४ किमीमध्ये दुतर्फा उभे राहून स्पर्धा पूर्ण होईपर्यंत सर्व धावपटूंना प्रोत्साहत करणार आहेत. चंडिका मंदिर ट्रस्ट, हॉटेल असोसिएशन आणि गणपतीपुळे ग्रामपंचायतीच्या माध्यमातून कलिंगड, केळी, संत्री, खजूर, मीठ इत्यादीची व्यवस्था केली आहे.

नेवरे ग्रामपंचायत आणि नेवरे ग्रामस्थांच्या माध्यमातून देखील सर्व व्यवस्था नेवरे गावात होत आहे. दयासागर पर्यटन संस्था एक हायड्रेशन पॉइंट सांभाळणार आहे. हॉटेल अंबज्ञ टेबल लाइट व्यवस्थेसाठी सहकार्य करणार असून कैरी होम स्टेतर्फे संत्री आणि कलिंगड वाटप होणार आहे. वारे गावात सर्व धावपटूंसाठी सौ. ज्योती जगदीश वारेकर यांच्याकडून कोकम सरबत वाटप केले जाणार आहे. ग्रामपंचायतीच्या माध्यमातून फळे ठेवली जाणार आहेत. डिलाइट इंडस्ट्रीच्या राजीव देवळे यांच्या माध्यमातून महत्त्वाच्या ठिकाणी लाइट व्यवस्था केली जाणार आहे.

आरे आणि बसणी गावात रूट मॅनेजमेंटसाठी सर्व ग्रामस्थ संपूर्ण सहकार्य करणार आहेत. महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध सायकलिंग क्लब रत्नागिरी सायकलिस्ट क्लब रूट सपोर्ट करणार आहे. दिवसभरात विविध बैठका घेतल्या गेल्या. यामध्ये प्रामुख्याने डॉ. श्रीराम केळकर (संस्थान श्रीदेव गणपतीपुळे सरपंच), विद्याधर शेंड्ये (सचिव, संस्थान श्रीदेव गणपतीपुळे), बाबाराम माने (श्री चंडिका देवी मंदिर ट्रस्ट अध्यक्ष), सौ. कल्पना पकये (सरपंच, गणपतीपुळे), महेश केदार (सदस्य, ग्रामपंचायत गणपतीपुळे), श्री. पाटील (एमटीडीसी), प्रमोद केळकर (हॉटेल असोसिएशन), उमेश भणसारी (हॉटेल असोसिएशन), तारक मयेकर, अमित घनवटकर, संजय रामाणी, विलास देवरूखकर, संदीप कदम, जगदीश वारेकर, देवीदास इंगळे (ग्रामसेवक, वारे गाव), दीपक फणसे (सरपंच, नेवरे गाव) यांनी पुढाकार घेतला.

पर्यटनासाठी काम करणाऱ्या राजू भाटलेकर यांच्याकडून पेन रिलीफ स्प्रे मिळणार आहेत. हॉटेल ऑनेस्ट नक्षत्रतर्फे धावपटूंना फळे, चिक्कीचे वाटप होणार आहे. या उपक्रमाचे फिनोलेक्स इंडस्ट्रीज, प्राचीन कोकण-एक अनोखे म्युझियम, फास्ट अँड अप, सॉर्जेन हे प्रमुख प्रायोजक आहेत. रुचकर कोकण, जोशी फुड्स, योजक फूड आणि बेवरेजेस यांच्या माध्यमातून कोकणी पदार्थ धावपटूंना दिले जाणार आहेत. आरोही फिजिओथेरपी (रत्नागिरी) आणि एस. एम. जोशी कॉलेज ऑफ फिजिओथेरपी सर्व धावपटूंच्या फिजिओथेरपीची व्यवस्था पाहणार आहे. नित्या प्राणिक हिलिंगतर्फे सर्व धावपटूंना बाथ सॉल्ट दिले जाणार आहे.

सुवर्णसूर्य फाउंडेशन आयोजित ही अल्ट्रा मॅरेथॉन फक्त कोकणची नाही तर अख्ख्या जगाची आहे. कोकणवासीय या नात्याने एक यशस्वी अल्ट्रा मॅरेथॉन कशी आयोजित करायची हे जगाला दाखवून देऊ या, या भावनेने सर्वजण एकत्र येत आहेत. गणपतीपुळे संस्थानाने १०० धावपटूंची राहायची सोय केली आहे. स्पर्धा संपल्यावर सर्व धावपटूंचा नाश्तादेखील देवस्थानच्या माध्यमातून दिला जाणार आहे. निसर्गयात्री संस्था, रत्नागिरी आणि असीमित (पुणे) हे हायड्रेशनचे व्यवस्थापन करणार आहेत.

हा उपक्रम यशस्वी होणार असून इथून पुढे दरवर्षी होत राहणार आहे, असा विश्वास सुवर्णसूर्य फाऊंडेशनचे संचालक प्रसाद देवस्थळी यांनी व्यक्त केला.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:27 22-03-2025