IPL 2025 : कोलकाता : गतविजेता कोलकाता आणि आजपर्यंत कधीही जेतेपद पटकावू न शकलेला बंगळुरू संघ यांच्यात शनिवारी रंगणाऱ्या सलामीच्या लढतीने आयपीएलच्या १८व्या सत्राला दिमाखात सुरुवात होईल. क्रिकेटप्रेमींचा उत्साह शिगेला पोहोचला असून, यंदा कोणता संघ बाजी मारेल, याची चर्चा सर्वत्र रंगू लागली आहे.
त्याचवेळी, यंदाच्या सत्रातील नवे नियम आणि नवे कर्णधार यांच्यावरही सर्वांचे लक्ष असेल.
आयपीएलने यंदाच्या सत्रात पुन्हा एकदा चेंडूवर लाळ लावण्याची परवानगी दिली आहे. त्यामुळे गोलंदाजांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. कोरोना महामारीमुळे क्रिकेटमधील या सर्वांत महत्त्वाच्या गोष्टीवर बंदी घालण्यात आली होती. मात्र, आता आयपीएलने ही बंदी उठविल्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पुन्हा एकदा चेंडूवर लाळ लावण्याची परवानगी मिळेल, अशी आशा व्यक्त होत आहे.
हा सामना कोलकाता येथील ईडन गार्डन्सच्या मैदानात खेळण्यात येणार आहे. त्यापूर्वी सायंकाळी 6 वाजता उद्घाटन सोहळा पार पडणार आहे. उद्घाटन सोहळ्यात बॉलिवूड अभिनेत्री दिशा पाटणी आणि लोकप्रिय गायिका श्रेया घोषाल रंग भरणार आहे. मात्र, उद्घाटन सोहळा आणि पहिली मॅच यावर अनिश्चिततेचं सावट निर्माण झालं आहे.
वरुण चक्रवर्तीवर लक्ष
स्टार फिरकीपटू वरुण चक्रवर्ती याच्या गोलंदाजीवर शनिवारी सर्वांचे लक्ष राहील. भारताच्या चॅम्पियन्स ट्रॉफी विजयात त्याची भूमिका महत्त्वाची ठरली होती. त्यामुळे विराट कोहली, फिल सॉल्ट अशा आक्रमक फलंदाजांपुढे तो कशाप्रकारे मारा करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
यंदाच्या आयपीएलमध्ये…
– बंगळुरूने सर्वात धक्कादायक निर्णय घेताना रजत पाटीदारकडे संघाची धुरा सोपविली. स्टार फलंदाज विराट कोहलीच्या उपस्थितीत कर्णधार म्हणून पाटीदार कशी कामगिरी करतो, याकडे सर्वांचे लक्ष लागेल.
– पटेल दिल्लीचे नेतृत्व करेल. गेल्या वर्षी कोलकाताला जेतेपद पटकावून देणारा श्रेयस अय्यर यंदा पंजाबचे कर्णधारपद सांभाळेल. कोलकाताने आपल्या संघाचे नेतृत्व अजिंक्य रहाणेकडे सोपविले आहे.
– संजू सॅमसनच्या बोटाच्या दुखापतीमुळे सुरुवातीच्या काही सामन्यांत राजस्थानचे कर्णधारपद रियान पराग सांभाळेल.
– गेल्या सत्रात तीनवेळा मुंबई संघाने संथ गतीने गोलंदाजी केल्याने कर्णधार हार्दिक पांड्यावर एका सामन्याच्या बंदीची कारवाई झाली होती. त्यामुळे यंदा सलामीच्या सामन्यात तो खेळू शकणार नाही. हार्दिकच्या अनुपस्थितीत सूर्यकुमार यादव मुंबईचे नेतृत्व करेल.
– आयपीएलमध्ये सर्वांत महागडा खेळाडू ठरलेला ऋषभ पंत यंदा लखनौ संघाचे नेतृत्व करेल.
– काही संघांनी आपल्या सहयोगी स्टाफमध्ये बदल केला आहे. रिकी पाँटिंग 3 दिल्लीऐवजी पंजाबचे मुख्य प्रशिक्षक म्हणून काम पाहतील. पौटिंगच्या जागी हेमांग बदानी यांची दिल्लीच्या मुख्य प्रशिक्षकपदी वर्णी लागली आहे.
७केविन पीटरसन दिल्ली संघाचे मेंटॉर म्हणून नियुक्त झाले आहेत. राहुल द्रविड यांचे मुख्य प्रशिक्षक म्हणून राजस्थान संघात पुनरागमन झाले आहे. डेन ब्रावो कोलकाता संघाचे मेंटॉर असतील. ते गौतम गंभीर यांची जागा घेतील.
पाऊस नको रे…
एकीकडे आयपीएलच्या पहिल्या सामन्याची उत्सुकता शिगेला पोहोचली असताना, दुसरीकडे पावसामुळे सर्वांच्या उत्साहावर पाणी फिरू शकते.
हवामान खात्याने शनिवारी जोरदार वाऱ्यासह पावसाची शक्यता वर्तविली आहे. या सामन्याआधी, शानदार उद्घाटन सोहळाही रंगणार आहे. यामध्ये श्रेया घोषाल, करण औजला आणि दिशा पाटनी आपली कला सादर करतील.
यंदाच्या सत्रात जवळपास सात संघ नव्या कर्णधारांसह मैदानात उतरणार आहेत. यातील काही कर्णधार विशिष्ट कारणांमुळे मर्यादित सामन्यांत आपापल्या संघाचे नेतृत्व करतील.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 22-03-2025
