रत्नागिरी : जय भवानी.. जय शिवाजीचा जयघोष करत शिवजयंतीनिमित्त रत्नागिरीत भव्यदिव्य शोभायात्रा काढण्यात आली. सायंकाळी जयस्तंभ येथून या शोभायात्रेचा प्रारंभ झाला. शोभायात्रेत महिला, पुरुष पारंपरिक वेशभूषेत सहभागी झाले.
तब्बल तीन तासांनी ही शोभायात्रा मारुती मंदिर येथे पोहोचली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या ठिकाणी या शोभायात्रेची सांगता झाली. या ठिकाणी विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
तत्पूर्वी रत्नदुर्ग किल्ल्यावरील श्री देवी भगवतीच्या मंदिरातून शिवज्योत आणण्यात आली. यासाठी दुचाकी फेरीने क्षत्रिय मराठा मंडळाचे कार्यकर्ते मारुती मंदिर येथून रत्नदुर्ग किल्ल्यावर पोहोचले. तेथून पुन्हा दुचाकी फेरी जयस्तंभ येथे आली. त्यानंतर शोभायात्रा सुरू झाली.
शोभायात्रेत दोन चित्ररथ होते. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज आणि संत तुकाराम महाराज भेट देखाव्यात छत्रपतींच्या भूमिकेत ओंकार मुचंडी, जिजामाता योगिनी सावंत, संत तुकाराम महाराज वेदांत सावंत आणि मावळ्यांची वेशभूषा श्रीनाथ नाईक आणि गौरेश गवस यांनी केले. छत्रपती संभाजी महाराज राज्याभिषेक देखाव्यात महाराजांची भूमिका अभिषेक इंदुलकर यांनी साकारली. तर रामराजे शिवांग साळवी, कवि कलश आर्य साळवी, हंबीरराव मोहिते देवेंद्र देसाई, महाराणी येसूबाई प्रियांका सासूलकर, मावळा शौनक इंदुलकर, योगेंद्र तावडे यांनी भूमिका केली. देवरुख येथील प्रथमेश जागुष्टे व सहकाऱ्यांनी मर्दानी खेळ सादर केले. हे खेळ शोभायात्रेचे आकर्षण ठरले. सडामिऱ्या येथील ढोलपथकाने वाहवा मिळवली.
क्षत्रिय मराठा मंडळातर्फे तिथीनुसार शिवजयंती साजरी करण्यात आली. दरवर्षी क्षत्रिय मराठा मंडळ शोभायात्रा, चित्ररथ, सजीव देखावे, शौर्य खेळांचे आयोजन करते. या वर्षी भव्यदिव्य स्वरूपात शोभायात्रा निघाली. शोभायात्रा सुरू झाल्यानंतर जयस्तंभ येथे साहसी खेळ दाखवण्यात आले. या यात्रेत सहभागी होण्यासाठी महिला, पुरुष पारंपरिक वेशात फेटे घालून आले होते. ढोल, झांज पथकांच्या गजराने सारा आसमंत दणाणून गेला. घोड्यावर विराजमान बाल शिवाजीराजांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. यासाठी अमित कदम आणि अक्षता इंदुलकर यांनी विशेष प्रयत्न केले.
छत्रपती शिवरायांचा जयघोष करत शोभायात्रा निघाली. जयस्तंभ, जेल रोड, माळनाका येथून ही शोभायात्रा मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ आली. तीन तासांनी ही शोभायात्रा मारुती मंदिरला पोहोचल्यानंतर जयघोष करण्यात आला. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यात आले. शिवजयंतीनिमित्त विशेष कार्यक्रमाचे आयोजन आले होते. या शोभायात्रेत मोठ्या संख्येने क्षत्रिय मराठा, रत्नागिरीकर आणि आसपासच्या गावांतील मराठा बंधू-भगिनी सहभागी झाल्या.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:40 22-03-2025














