दापोली : दापोली तालुक्यातील आझाद मैदानात, दि. २० मार्च २०२५ रोजी रात्री ८:१५ वाजेच्या सुमारास एक ५७ वर्षीय व्यक्ती बेशुद्ध अवस्थेत आढळून आली. त्याला तात्काळ उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी अंती त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी दापोली पोलीस ठाण्यात शुक्रवारी पहाटे ४:०० वाजता माहिती नोंदवण्यात आली आहे.
मयत दत्ताराम महादेव भातडे (वय ५७, रा. तेरेवांयंगणी पहिलीवाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) हे रात्री आझाद मैदान परिसरात बेशुद्ध अवस्थेत पडलेले आढळले. खबर देणारे आणि त्यांच्यासोबत असलेल्या ग्रामस्थांनी तात्काळ रुग्णवाहिकेची मदत घेऊन त्यांना उपजिल्हा रुग्णालय दापोली येथे दाखल केले. रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दत्ताराम भातडे यांची तपासणी केली असता, त्यांना मृत घोषित करण्यात आले. मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
या घटनेची माहिती मिळाल्यानंतर दापोली पोलीस ठाण्यात दि. २१ मार्च २०२५ रोजी पहाटे ४:०० वाजता नोंद करण्यात आली. प्रकरणाची नोंद आमृ. क्रमांक २२/२०२५ अंतर्गत बी.एन.एस.एस. (भारतीय नागरी सुरक्षा संहिता) कलम १९४ प्रमाणे करण्यात आली आहे. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला असून, मृत्यूच्या कारणाचा तपास सुरू केला आहे.
दत्ताराम भातडे यांच्या अकस्मात मृत्यूमुळे तेरेवांयंगणी गावात आणि दापोली परिसरात शोककळा पसरली आहे. स्थानिकांनी ही घटना धक्कादायक असल्याचे सांगितले असून, मृत्यूचे नेमके कारण जाणून घेण्यासाठी पोलिसांनी तपास त्वरित पूर्ण करावा, अशी मागणी केली आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:08 22-03-2025














