”कधीकाळी वाघ बाई पक्षप्रवेशासाठी उद्धव ठाकरेंकडे लोळत आल्या होत्या” : सुषमा अंधारे

पुणे : सध्या दिशा सालियन प्रकरणावरुन पुन्हा एकदा राजकीय वादंग उठलं असून शिवसेना उबाठा पक्षाचे नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर टीका केली जात आहे. दिशा सालियनचे वडिल सतिश सालियन यांनी दिशा सालियन मृत्यूप्रकरणाची पुन्हा चौकशी करावी, यासंदर्भात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

या याचिकेनंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून विधिमंडळ सभागृहात देखील याचे पडसाद पाहायला मिळाले. त्यावरुन, सत्ताधारी आणि विरोधक आमने-सामने आले असून शिवसेना शिंदे गटातील काही आमदारांनीही आदित्य ठाकरेंच्या चौकशीची मागणी केली आहे. भाजप आमदार चित्रा वाघ (Chitra wagh) यांच्यासह शिवसेनेतील महिला नेत्यांनीही ठाकरेंना लक्ष्य केल्याचं पाहायला मिळालं. शिवसेना आमदार मनीषा कायंदे यांनीही सभागृहात याप्रकरणी भूमिका घेतली होती. आता, शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिंदे गटातील महिला नेत्यांवर आणि चित्रा वाघ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. कधीकाळी या बाई उद्धव ठाकरेंकडे पक्षप्रवेशासाठी लोळत आल्या होत्या, अशा शब्दात सुषमा अंधारे (Sushma andhare) यांनी निशाणा साधला आहे.

वाघ बाईंनी काल जी भाषा वापरली त्यावर मी जाणार नाही, वाघबाई आणि किरीट सोमय्या यांचा भाजप कसा वापर करून घेत आहे ते दिसतय. वाघ बाईंनी कमी आकडा सांगितला तो कमी आहे, असेही सुषमा अंधारे यांनी आज पुन्हा एकदा म्हटलं. महाराष्ट्राची परंपरा फुले, शाहू आणि आंबेडकरांची आहे, राज्याच्या सभागृहाला मोठी परंपरा आहे. कालचा थयथयाट सभागृहाची गरिमा खाली आणणारा होता, असे म्हणत सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा भाजप आमदार चित्रा वाघ यांच्यावर निशाणा साधला.

नागपूर दंगलीतील आरोपी भाजपशी संबंधित आहे, त्याबाबत आपण लवकर पुरावे दाखवणार आहोत. नागपूर दंगल अंगाशी आली आहे, म्हणून भाजपने दिशा सालियन प्रकरण बाहेर काढले आहे. एखाद्याच्या दुःखाला आपलं राजकारण करण्याचं नीच काम भाजपकडून होत आहे. एक बाई विचित्रपणे किंचाळत होत्या, अनेकजण म्हणाले की झोपडपट्टीतील भाषा वापरली जात होते. पण, झोपडपट्टीला देखील एक क्लास असतो, झोपडपट्टीतील लोकं आपलं इमान विकत नाहीत. सभागृहात आणखी एक बाई होत्या, ज्यांना आम्हीच सदस्यत्व दिलं. पण, जिकडे खावा तिकडे थवा असं काम आहे. या बायकांच्या आडून भाजप तिर मारत आहेत, म्हणून मी इथे उत्तर देत आहे, असेही सुषमा अंधारे यांनी म्हटलं.

कधीकाळी या बाई पक्ष प्रवेशासाठी उद्धव ठाकरे यांच्याकडे लोळत आल्या होत्या. संजय राठोड यांना उद्धव ठाकरेंनी क्लीन चिट दिली असं यांचं म्हणणं असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांच्या मंत्रिमंडळात ते मंत्री कसे?, असा सवाल सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांना विचारला.

वाघ बाई भटक्या समाजातील लोकांचे करिअर उद्धवस्त करते

वाघ बाई भटक्या समाजातील लोकांचे करिअर उद्धवस्त करत आहेत, पूजा चव्हाण यांची केस पून्हा ओपन करा, अशी मागणी सुषमा अंधारे यांनी केली. आमच्या पक्षातील नेते रघुनाथ कुचिक यांचे प्रकरण चित्रा वाघ यांनी लावून धरलं होते. या प्रकरणातील पीडित तरुणीने जे खुलासे केले होते, शिवसेनेला डॅमेज करण्यासाठी मला चित्रा वाघ यांनी सांगितले होते, असं पीडित तरुणीने सांगितलं होते. मेहबूब शेख प्रकरणात देखील पीडित तरुणीला चित्रा वाघ यांनी सांगितलं होतं, तुला एफआयआरप्रमाणेचं बोलाव लागेल, माझा चित्रा वाघ यांनी व्हिडीओ देखील काढला होता, असेही पीडित तरुणीने म्हटले होते, अशी माहितीही सुषमा अंधारे यांनी दिली.

उद्धव ठाकरेंबाबत फेक नेरेटिव्ह

संतोष देशमुख हत्या प्रकरणाला तीन महिने झाले आहेत, मात्र त्याचा आरोपी अद्याप फरार आहे. 100 दिवसात ज्या लोकांचे घोटाळे बाहेर आले ते माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळातील आहेत. उद्धव ठाकरेंबाबत फेक नेरेटिव्ह तयार करण्याचे काम केले जातं आहे. दिशा सालियनप्रकरणात मनिषा कायंदे आधी काय बोलल्या होत्या हे सर्वांना माहिती आहे, औरंगजेबच्या कबरीचा मुद्या अंगाशी आल्यामुळे दिशा प्रकरण काढण्यात आल्याची टीका चित्रा वाघ यांनी केली.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
12:13 22-03-2025