रत्नागिरी : शहराजवळील सोमेश्वर, गुरूमळी, काजरघाटी येथे भरतीच्या पाण्यामुळे कडधान्य शेतीला मोठा फटका बसला आहे. ऐन हंगामात भरतीचे पाणी घुसल्याने पावटा, कडवा, चवळी या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कोवळ्या झालेल्या शेंगा यामुळे फुकट गेल्या असून, शेतकऱ्यांना मोठा फटका बसला आहे.
भातशेतीनंतर मातीतील ओलाव्यावर होणाऱ्या कडधान्य शेतीमुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते. पावटा, चवळी, कुळीथ, मूग, कडवा, वाल यातून शेतकरी वर्षभराची बेगमी करतो. यावर्षी खाऱ्या पाण्यामुळे येथे अर्धे पीक फुकट गेले आहे. हे पीक तोडून टाकण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. दरवर्षी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कडधान्य शेती केली जाते. यावर्षी पीक चांगले होते. फुलोऱ्यानंतर कोवळ्या शेंगाही लागल्या होत्या. शेतमळ्यामध्ये अनेक ठिकाणी काढणीही सुरू झाली होती. त्याचवेळी भरतीच्या पाण्यामुळे खारे पाणी शेतीला लागले. त्यामुळे येथील कडधान्य पीक काळे पडून मेले आहे. त्यावर लागलेल्या कोवळ्या शेंगा काढूनही काही फायदा नसल्याने येथील शेतकऱ्यांनी त्याची तोडणी सुरू केली आहे.
नुकसान भरपाई मिळावी
भरतीच्या पाण्यामुळे शेतकऱ्यांच्या होणाऱ्या नुकसानीचा शासनाने विचार करावा. त्यांना भरपाई मिळावी यासाठी पुढाकार घ्यावा अशी मागणी बाधित शेतकऱ्यांकडून केली जात आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:38 22-03-2025














