सावर्डेत गावठी दारू जप्त : आंब्याच्या झाडाखाली आरोपीसह १० लिटर दारू ताब्यात

सावर्डे : रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील नांदगाव गोसावीवाडी येथे रविवारी दुपारी १२.४५ वाजण्याच्या सुमारास सावर्डे पोलिसांनी एका आंब्याच्या झाडाखाली गावठी दारूचा साठा जप्त केला आहे. या कारवाईत आरोपी कृष्णा सिताराम साळुंखे याच्याकडून ११०० रुपये किमतीची १० लिटर गावठी हातभट्टीची दारू ताब्यात घेण्यात आली असून, त्याच्याविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी स्नेहा धीरज घोसाळकर (मपोहेकॉ/१३३६, सावर्डे पोलीस ठाणे) यांनी दिलेल्या माहितीनुसार, काल दुपारी नांदगाव गोसावीवाडी येथे गस्त घालत असताना एका आंब्याच्या झाडाखाली संशयास्पद हालचाली दिसल्या. तपासणीदरम्यान, आरोपी कृष्णा सिताराम साळुंखे (रा. गोसावीवाडी, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) हा १० लिटर गावठी हातभट्टीची दारू बेकायदेशीरपणे आपल्या ताब्यात बाळगताना आढळून आला. ही दारू बिगरपरवानगी आणि गैरकायदेशीररित्या ताब्यात असल्याचं निष्पन्न झालं.

पोलिसांनी घटनास्थळावरून १० लिटर गावठी हातभट्टीची दारू जप्त केली, ज्याची अंदाजे किंमत ११०० रुपये आहे. ही दारू हातभट्टीतून तयार केलेली असून, ती स्थानिक पातळीवर विक्रीसाठी ठेवण्यात आली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.

या कारवाईनंतर सावर्डे पोलिसांनी रविवारी संध्याकाळी ६.४० वाजता महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम ६५(ई) अंतर्गत गुन्हा दाखल केला. गुन्हा क्रमांक ३५/२०२५ असा नोंदवण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
14:24 24-03-2025