रत्नागिरी : मागील काही वर्षांपासून उद्योगापासून दूर राहिलेल्या रत्नागिरी जिल्ह्यात विशेषत: रत्नागिरी तालुक्यामध्ये नवनवे प्रकल्प आणण्यात राज्याचे उद्योगमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री व रत्नागिरीचे आमदार यशस्वी झाले आहेत. या उद्योगांसाठी आवश्यक असणार्या जागांचे भूसंपादनही सुरू असून, यातील मँगो पार्कसाठी निवेंडी तर रिळउंडी एमआयडीसीसाठी मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, यासाठी आवश्यक चारशे कोटींच्या निधीची मागणी प्रशासनाने एमआयडीसीकडे केली आहे.
अडीच वर्षांपूर्वी राज्याचे उद्योगमंत्री पद मिळाल्यानंतर रत्नागिरीमध्ये मँगोपार्क तर दापोलीतील हर्णे येथे फिशपार्क उभारण्याची घोषणा ना. उदय सामंत यांनी केली होती. त्या द़ृष्टीने रत्नागिरी मतदारसंघात निवेंडी येथे मँगो पार्क उभारण्यासाठी हालचालीही सुरू झाल्या आहेत. यासाठी 104 हेक्टर जमिनीचे भूसंपादन केले जाणार असून, त्याची मोजणीही पूर्ण झाली आहे. यासाठी 144.99 कोटी रुपयांची मागणी प्रशासनाने एमआयडीसीकडे केली आहे. या जागेचे अंतिम नोटीफिकेशनही निघाले आहे. याचप्रमाणे रिळउंडी येथेही प्रकल्प उभारला जाणार असून, याठिकाणी 205 हेक्टर जागेचे भूसंपादन होणार आहे. या ठिकाणीही मोजणी प्रक्रिया पूर्ण झाली असून, त्यासाठी 254 कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे.
रत्नागिरीमध्ये वाटद एमआयडीसीत हत्यारांचा तर रत्नागिरीत सेमीकंडक्टर प्रकल्प प्रस्तावित आहेत. या सेमी कंडक्टर प्रकल्पाचा दुसरा टप्पा रिळउंडी परिसरात होणार आहे. उद्यागमंत्री उदय सामंत यांनी या सेमीकंडक्टर प्रकल्पासाठी शिरगाव एमआयडीसीत जागा उपलब्ध करून दिली आहे. या प्रकल्पांमुळे जवळपास 40 हजारहून अधिक रोजगार उपलब्ध होणार आहेत. पुढील पाच वर्षात त्यामुळे रत्नागिरीचा कायापालट होण्यास मदत होणार आहे. मागील पाच वर्षात मंत्रीपदाच्या कारकिर्दीत ना. सामंत यांनी उच्च तंत्र खाते असताना रत्नागिरीला एज्युकेशन हब बनवण्यासाठी विविध शासकीय महाविद्यालये सुरु केली. त्यामुळे बाहेरील हजारो विद्यार्थी सध्या रत्नागिरीत शिक्षण घेत असून, याचाही फायदा रत्नागिरीला होताना दिसत आहे.
काय असेल मँगो पार्कमध्ये…
या मँगो पार्कमध्ये आंब्यावर आधारित पूरक प्रक्रिया उद्योग उभारणार आहे. आंबा कॅनिंग, ग्रीडिंग असे प्रकल्प यात होणार आहेत. कोकणातील आंब्यांच्या वैशिष्ट्यांची माहिती देणार आहेत. आंबा प्रक्रियावर आधारित उद्योगांना एकत्रित आणण्यात येणार आहे.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:41 25-03-2025














