चिपळूण : चिपळूण नगर परिषदेचे प्रशासक तथा मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या माझी वसुंधरा अभियान अंतर्गत शहरातील नारायण तलाव येथे नुकतेच रोपवाटिका व बीज संकलन केंद्र उपक्रमाचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी शालेय विद्यार्थ्यांसह शहरातील पर्यावरण, निसर्गप्रेमी व मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माझी वसुंधरा अभियान अंतर्गत सध्या चिपळूण नगर परिषदेकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. मुख्याधिकारी विशाल भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या उपक्रमांचे आयोजन होत असून प्रामुख्याने पर्यावरण संरक्षण, स्वच्छता व पाण्याचा योग्य वापर, वन संरक्षण, वृक्ष लागवड आदी महत्त्वाचे उपक्रम गेल्या काही दिवसांपासून विविध कार्यक्रमातून हाती घेण्यात आले आहेत. त्यानुसार नारायण तलाव येथे नगर परिषदेने अत्यंत आकर्षक अशी रोपवाटिका उभारली आहे. यामध्ये विविध प्रकारची फुलझाडे, फळझाडे, अन्य वृक्ष यांचा समावेश आहे.
या बरोबरच विविध प्रकारच्या वृक्षांची बिजे संकलित करण्याचा उपक्रम देखील सुरु करण्यात आला आहे. या उपक्रमाचा नुकताच शुभारंभ मुख्याधिकारी विशाल भोसले तसेच मंडणगड नगरपंचायत मुख्याधिकारी कुंभार यांच्या प्रमुख उपस्थितीत झाला.
यावेळी उपक्रमात सहभागी झालेल्या शालेय विद्यार्थ्यांसह निसर्ग व पर्यावरण प्रेमींना निसर्गरक्षण, पृथ्वी रक्षण, वृक्ष लागवड या संदर्भात शपथ देण्यात आली. त्यानुसार पर्यावरणाचे संतुलन राखण्यासाठी प्रदूषणमुक्त पर्यावरण तसेच स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी व वृक्ष जोपासना करण्याची जबाबदारी प्रत्येक नागरिकाची असून या शपथेद्वारे आम्ही पृथ्वी, देश, शहर स्वच्छ ठेवण्याबरोबरच पर्यावरणाचे संतुलन ठेवण्याकरिता व प्रदूषण रोखण्याकरिता काम करू अशी शपथ देण्यात आली.
त्यानंतर माजी उपनगराध्यक्ष बापू काणे, माजी नगरसेवक राम रेडीज, शशिकांत मोदी, मुख्याधिकारी भोसले, मंडणगड नगर परिषदेचे मुख्याधिकारी कुंभार यांच्याहस्ते हा शुभारंभ करण्यात आला. नागरिकांनी आवश्यक ती रोपे रोपवाटिकेद्वारे उपलब्ध केली जातील. तसेच विविध प्रकारची बिजे नागरिकांनी रोपवाटिकेत आणून द्यावीत, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
कार्यक्रमास उपमुख्याधिकारी दंडवते, नगर परिषदेचे प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर, उद्यान विभागप्रमुख प्रसाद साडविलकर, वैभव निवाते, नयनीश गुढेकर, आदिती देशपांडे, परिसरातील नागरिक आणि विद्यार्थी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:08 AM 25/Mar/2025














