शेजवान चटणी आणण्यासाठी गेलेल्या महिलेवर हल्ला; चार जणांवर गुन्हा

संगमेश्वर : संगमेश्वर तालुक्यातील निढळेवाडी तिठा येथे काल रात्री ९:४५ च्या सुमारास एका किरकोळ कारणावरून महिलेवर आणि तिच्या पतीवर हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी चार जणांविरुद्ध संगमेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हल्ल्यात महिलेचे मंगळसूत्र तुटले असून, तिच्या वाहनाचेही नुकसान झाले आहे.

प्राथमिक माहितीनुसार, ही घटना २३ मार्च २०२५ रोजी रात्री ९:४५ च्या सुमारास घडली. फिर्यादी असलेली एक महिला शेजवान चटणी आणण्यासाठी दुकानात जात असताना शेजारी राहणारे आरोपी मंगेश वसंत बोडवलकर आणि त्याचा भाऊ अमोल बोडवलकर यांच्यात भांडण सुरू होते. याच वेळी मंगेश बोडवलकर याने फिर्यादी महिलेला पाहून शिवीगाळ सुरू केली आणि तिच्यावर धावून गेला. त्यानंतर आरोपी मंगेश याच्यासह त्याची पत्नी (आरोपी क्र. २), मुलगा श्लोक मंगेश बोडवलकर (आरोपी क्र. ३) आणि वडील गुलाब वसंत बोडवलकर (आरोपी क्र. ४) यांनी महिलेवर हल्ला चढवला.

हल्लेखोरांनी रस्त्यालगतच्या बलारातून काट्या उपसून महिलेला मारहाण केली. या हल्ल्यात महिलेच्या डोक्याला, उजव्या हाताला आणि उजव्या पायाच्या मांडीवर दुखापत झाली. महिलेच्या पतीने हस्तक्षेप करून तिला सोडवण्याचा प्रयत्न केला असता, हल्लेखोरांनी त्यांनाही काठीने मारहाण करून डोक्याला आणि उजव्या हाताला जखमी केले. याशिवाय, हल्लेखोरांनी ढकलाढकली करत महिलेचे मंगळसूत्र तोडले आणि त्यांच्या गाडीवर लाथा मारून वाहनाचे नुकसान केले. हल्ल्यादरम्यान आरोपींनी फिर्यादी दाम्पत्याला ठार मारण्याची धमकीही दिली.

पोलिसांत गुन्हा दाखल
या घटनेची तक्रार फिर्यादी महिलेने संगमेश्वर पोलीस ठाण्यात नोंदवली. ही तक्रार आज, २४ मार्च २०२५ रोजी पहाटे २:०८ वाजता दाखल करण्यात आली. पोलिसांनी भारतीय न्यायसंहिता अधिनियम २०२३ च्या कलम ११८(१), ३५२, ३५१(२), ३२४(४)(५) आणि ३(५) अंतर्गत गुन्हा नोंदवला आहे. गुन्हा क्रमांक ५५/२०२५ असा या प्रकरणाला देण्यात आला आहे. आरोपींमध्ये मंगेश वसंत बोडवलकर, त्याची पत्नी, मुलगा श्लोक मंगेश बोडवलकर आणि वडील गुलाब वसंत बोडवलकर यांचा समावेश आहे.

दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
10:54 25-03-2025