रत्नागिरी : निरक्षरतेचा शिक्का पुसण्यासाठी जिल्ह्यातील ९ हजार ८०० जणांनी रविवारी शासनाकडून ‘उल्लास नवभारत साक्षरता अभियानांतर्गत परीक्षा दिली. यामध्ये तरुण-तरुणी ते ७० वर्षांच्या आजी-आजोबांनीही यावेळी उत्साहाने सहभाग घेतला.
केंद्र शासन पुरस्कृत, उल्लास नव भारत साक्षरता कार्यक्रम सन २०२२-२३ ते सन २०२६-२७ या कालावधीत केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्याचा शासनाने निर्णय घेतला आहे. देशातील १५ वर्ष आणि त्याह्न अधिक वयोगटातील निरक्षर व्यक्तींमध्ये पायाभूत साक्षरता (बाचन, लेखन) व संख्याज्ञान विकसित करून देशातील १५ वर्ष आणि त्यावरील वयोगटातील असाक्षर व्यक्तींना महत्त्वपूर्ण जीवन कौशल्ये विकसित करण्याच्या दृष्टिकोनातून या उपक्रमाची मुहूर्तमेढ रोवली गेली.
या उपक्रमाच्या माध्यमातून प्रौढ नव-साक्षरांसाठी निरंतर शिकण्याच्या प्रक्रियेचा एक भाग म्हणून देशातील १५ वर्षे आणि त्यावरील वयोगटातील विद्यार्थ्यांमध्ये व्यावसायिक कौशल्ये विकसित करता येतील.
त्याची अंमलबजावणी केंद्र आणि राज्य व केंद्रशासित प्रदेश स्तरावरील संबंधित मंत्रालये, विभागांच्या साहाय्याने केली जात आहे. महाराष्ट्राने दि. १४ मार्च २०२२ रोजीच्या शासन निर्णयाद्वारे ही योजना स्वीकारली आहे. या कार्यक्रमात उल्लास अॅपवर असाक्षरांच्या नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. नोंदणी झालेल्या असाक्षरांची पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी रविवार २३ मार्च २०२५ रोजी ऑफलाईन पद्धतीने केंद्र शासनाच्या निर्देशानुसार महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये घेण्यात आली.
या कार्यक्रमांतर्गत ज्या शाळेतून उल्लास अॅपवर असाक्षर व्यक्तींची नोंदणी केलेली आहे व दि. १७ मार्च २०२४ रोजी झालेल्या परीक्षेत शेरा मिळालेले असाक्षर अशा सर्वांची शाळेमध्ये सकाळी १०.०० ते सायंकाळी ०५.०० या वेळेत पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी घेण्यात आली.
ही परीक्षा वाचन, लेखन व संख्याज्ञान चाचणी या प्रकारामध्ये असून एकूण १५० गुणांची आहे. सन २०२३-२४ मध्ये रत्नागिरी जिल्ह्यामधून १३,४७० असाक्षरांनी परीक्षा दिली, तर सन २०२४-२५ मध्ये ९ हजार ८०० एवढे नवसाक्षर परीक्षेस बसले आहेत.
पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान मूल्यमापन चाचणी परीक्षा विहित निकषानुसार उत्तीर्ण झाल्यानंतर नवसाक्षरांना केंद्र शासनाकडून प्रमाणपत्रक, गुणपत्रक देण्यात येईल. या परीक्षेच्या माध्यमातून व्यक्तीच्या जीवनामध्ये आर्थिक साक्षरता, कायदेविषयक साक्षरता, डिजिटल साक्षरता, आपत्ती व्यवस्थापन कौशल्य, आरोग्याची काळजी व जागरुकता, बालसंगोपन आणि शिक्षण, कुटुंब कल्याण ही जीवनकौशल्ये विकसित होतील. तसेच त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल.
तसेच दैनंदिन जीवन जगत असताना स्वतःच्या कुटुंबात, पाहुणे, नातेवाईक यांच्यामध्ये आपले कौतुक होईल. वेगवेगळ्या दुकानांमध्ये वस्तुची खरेदी करणेसाठी गेले असता फसवणूक होणार नाही. बँक, पोस्ट ऑफिस इ. ठिकाणी आर्थिक व्यवहारामध्ये फसवणूक होणार नाही, असा विश्वास नवसाक्षरांना देण्यात आला.
दैनिक रत्नागिरी खबरदार
ISO 9001:2015 CERTIFIED
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
11:14 AM 25/Mar/2025














